पुणे - इमारतीच्या पार्किंगमध्ये खेळणाऱ्या सात वर्षीय चिमुकलीवर आठ ते दहा मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. अलीना इमरान बागवान असे जखमी मुलीचे नाव आहे. मोकाट कुत्र्यांनी या चिमुकलीचे लचके तोडल्याने परिसरात दहशत पसरली आहे.
बारामती शहरातील समर्थनगर परिसरातील इमारतीच्या पार्किंगमध्ये अलीना खेळत होती. अचानक आठ ते दहा मोकाट कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. त्या चिमुकलीला कुत्र्यांनी पार्किंगमधून फरफटत बाहेर मोकळ्या पटांगणात नेत लचके तोडले. हा प्रकार चिमुकलीच्या वडिलांनी व शेजार्यांनी पाहिल्याने त्यांनी धावत जाऊन मोकाट कुत्र्यांच्या तावडीतून चिमुकलीला सोडविले. त्यामुळे तिचा प्राण वाचला. जखमी चिमुकलीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मोकाट कुत्र्यांबद्दल वेळोवेळी चर्चा होते आणि ती हवेतच विरते. त्या चर्चेची काहीच फलनिष्पत्ती निघत नाही. चर्चेचे गुर्हाळ चर्चेतच संपते. शहरात वाढलेल्या मोकाट कुत्र्यांच्या संदर्भात नगरपालिकेला वेळोवेळी निवेदने दिले. मोर्चे काढले मात्र अद्याप मोकाट कुत्र्यांचा नगरपालिकेला बंदोबस्त करता आलेला नाही. शहरात मोकाट कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली आहे. आज झालेल्या मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यासारखी एखादी गंभीर घटना घडल्यानंतरच प्रशासनासमोर आंदोलन वगैरे केले जाते. त्यानंतर ठरल्याप्रमाणे प्रशासन संतप्त नागरिकांना कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन देते. नंतर पुन्हा परिस्थिती पूर्ववत असते. अशा कुत्र्यांचा प्रश्न कायमस्वरुपी मिटवण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरु लागली आहे.