पुणे- पिंपरी-चिंचवड शहरात महानगरपालिकेच्या रुग्णालयासह इतर ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून तेथील डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी हे खूप मेहनत घेत असून दिवस रात्र रुग्णांची सेवा करत आहेत. अनेक जण कुटुंबापासून दूर देखील राहतात.
या कोरोना योद्धांना प्रोत्साहन मिळावे, या हेतुने गुरुवारी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, स्मिता पाटील, सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर.आर पाटील, श्रीधर जाधव यांनी डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी यांचा मास्क, गुलाबाचे फुल आणि इतर साहित्य देऊन सन्मान करत कौतुक केले.
पिंपरी-चिंचवड शहरातील महानगरपालिकेच्या रुग्णालयासह इतर खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. महानगर पालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, आदित्य बिर्ला मेमोरीयल हॉस्पिटल, औंध येथील उरो जिल्हा रुग्णालय, स्टर्लिंग रुग्णालय, भोसरीमधील नूतन रुग्णालय, डी.वाय पाटील येथील रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
दरम्यान शहरातील कोरोनाबाधितांची संख्या १८३ वर पोहचली असून त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी करत आहेत. त्यांचा सन्मान आणि पाठिंबा देण्याचे काम पोलीस आयुक्तालय पिंपरी-चिंचवडच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. रुग्णालयात जाऊन डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी यांच्याशी पोलीस अधिकाऱ्यांनी संवाद साधला. तर काही ठिकाणी केक कापून त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला.