पुणे - मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती तिच्या मुलांना दिली असता, त्या मुलांसह अन्य दोघांनी मिळून डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली. या मारहाणीचा संपुर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी मंचर पोलिसांत मुलासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कृष्णाकांत खराडे यांनी दिली.
आईच्या मृत्यूची माहिती मिळताच मृत महिलेच्या मुलाने मंचर ग्रामीण रुग्नालयाचे वैद्यकीय आधिकारी डॉ. महेश नारायण गुडे यांना फोनवरुन शिवीगाळ केली. तसेच दोन सहकाऱ्यांसमवेत रुग्नालयात येऊन डॉ. महेश गुडे यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाणही केली. यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत डॉ. गुडे यांना वाचविले. मात्र, मृताच्या नातेवाईंकाकडून शिवीगाळ सुरूच होती. हाणामारीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेनंतर डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या विरोधात नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या मारहाण प्रकरणी डॉ. गुडे यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर मृत महिलेच्या मुलासह इतर दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.