पुणे - शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली. मावळमधून तसेच शेजारच्या पिंपरी-चिंचवडमध्ये कमळाची पाकळी ठेवायची नाही. मतदानानंतर लगेच दिवाळी सुरू होणार आहे. देशातील तसेच राज्यातील समस्या संपवण्यात अपयशी ठरलेल्या भाजप-शिवसेना सरकारचे दिवाळं काढल्याशिवाय यंदाची दिवाळी साजरी करायची नाही, असे आवाहन डॉ. कोल्हे यांनी मावळवासीयांना केले. ते उमेदवार सुनील शेळके यांच्या प्रचार सभेत बोलत होते.
महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या, तरुणांचा रोजगार, माता भगिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न असेल यासारख्या समस्यांबाबतीत भाजप सरकार नापास झाले आहे. निवडणुकीसाठी भाजप सरकारकडे आता कोणतेच मुद्दे शिल्लक नाहीत. निवडणूक मावळची, मुद्दा काश्मीरचा, मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचा. ही अशी निवडणूक असते होय? असा सवाल अमोल कोल्हे यांनी लोणावळ्यात सत्ताधाऱ्यांना केला.
हे वाचलं का? - काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्टवादी युतीनं महाराष्ट्राचं नुकसान झालं
खासदार कोल्हे यांना सभास्थळी येण्यास उशीर झाल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. मावळच्या रस्त्यावर ४०० कोटी रुपये खर्च झाले असते, तर मी अर्धा तास लवकर आलो असतो, असे ते म्हणाले. ही निवडणूक महाराष्ट्राच्या भविष्याची निवडणूक आहे. आता मात्र सुनील शेळके यांच्याशिवाय पर्याय नाही. मध्यंतरी भाजपचा अजगर झाला होता. ईडी, सीबीआय, असे फुत्कार टाकून राष्ट्रवादीची माणसे गिळणाऱ्या या अजगरावर ७९ वर्षाच्या शरद पवार नावाच्या तरुणाने वर्मी घाव घातला, असल्याचे देखील कोल्ह म्हणाले.