पुणे - जिल्ह्यातील शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात किमान 65 टक्के मतदानाचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे. येत्या सोमवारी 29 एप्रिलला शिरूर आणि मावळ लोकसभेसाठी मतदान होते आहे. याआधी पुणे जिल्ह्यात झालेल्या पुणे लोकसभा मतदार संघामध्ये जेमतेम 49 टक्के इतकेच मतदान झाले. त्याचीच चर्चा सध्या सुरू असल्याने आता शिरूर आणि मावळमध्ये चांगले मतदान कसे होईल यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू केले आहेत.
मावळ लोकसभा मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणुकीत 60.16 टक्के तर शिरूर लोकसभा मतदारसंघात 59.7 टक्के मतदान झाले होते. या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढवण्याबरोबरच संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे.
मावळ लोकसभा मतदार संघात एकूण मतदारांची संख्या 22 लाख 97 हजार 405 एवढी आहे. तर या ठिकाणी मतदान केंद्रांची संख्या ही 2 हजार 504 एवढी आहे. शिरूर लोकसभा मतदार संघाचा विचार केला तर शिरूर लोकसभा मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या 21 लाख 73 हजार 424 एवढी आहे तर मतदान केंद्रांची संख्या 2296 एवढी आहे. जिल्हा प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील मतदान केंद्र निवडलेली आहेत. मावळ लोकसभा मतदार संघात 47 मतदान केंद्र संवेदनशील आहेत तर शिरूर लोकसभा मतदारसंघात 31 मतदान केंद्र संवेदनशील आहेत.
लोकसभा मतदारसंघ निहाय विधानसभा मतदार संघाच्या मतदानाची आकडेवारी पाहिल्यास, मावळ लोकसभा मतदार संघात पनवेल विधानसभा मतदारसंघात 5 लाख 39 हजार 187, कर्जत विधानसभा मतदारसंघात 2 लाख 79 हजार 790, उरण विधानसभा मतदारसंघात 2 लाख 90 हजार 273, मावळ विधानसभा मतदारसंघात 3 लाख 37 हजार 657, चिंचवड विधानसभा मतदारसंघात 5 लाख 2 हजार 740, पिंपरी विधानसभा मतदार संघात 3 लाख 47 हजार 758 मतदार आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर पनवेल विधानसभा मतदारसंघ हा सर्वाधिक मतदार असलेला विधानसभा मतदारसंघ आहे. तर कर्जत विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदार आहेत.
शिरूर लोकसभा मतदारसंघात जुन्नर विधानसभा मतदारसंघात 2 लाख 98 हजार 848, आंबेगाव विधानसभा मतदारसंघात 2 लाख 80 हजार 334, खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात 3 लाख 23 हजार 051, शिरूर विधानसभा मतदारसंघात 3 लाख 69 हजार 812, भोसरी विधानसभा मतदारसंघात 4 लाख 13 हजार 680 तर हडपसर विधानसभा मतदारसंघात 4 लाख 87 हजार 699 एवढे मतदार आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघात हडपसर विधानसभा मतदारसंघ हा सर्वात जास्त मतदार असणारा विधानसभा मतदारसंघ आहे. तर आंबेगाव विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदार आहेत.