पिंपरी-चिंचवड - पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे हे पुरग्रस्तांच्या मदतीला धावून गेले आहेत. सांगली, सोलापूर, महाड आणि चिपळूण येथे जीवनावश्यक वस्तूंची त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. दरम्यान, नेत्यांनी दौरे टाळून अशा पद्धतीने पूरग्रस्तांच्या मदतीला धावून जाणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनावश्यक वस्तूंचे किट घेऊन 26 वाहने पुरग्रस्तांच्या मदतीला पोहचले आहेत.
पूर ओसरला आता मदतीची गरज -
गेल्या आठवड्यात सांगली, सोलापूर, महाड आणि चिपळूण यासह राज्याच्या इतर ठिकाणी अतिवृष्टी झाली. यामुळे, अनेक शहर पाण्याखाली गेली शिवाय हजारो नागरिकांना बेघर व्हावे लागले. या परिस्थितीमुळे नागरिकांना अश्रू अनावर झाले होते. दरम्यान, काही ठिकाणची परिस्थिती निवळली असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. परंतु, नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून जीवनावश्यक वस्तूची गरज भासत आहे. अशा वेळी महाराष्ट्रातील अनेक सुपुत्र मदतीला धावून जात आहेत.
राजकीय व्यक्तीसह नागरिकांनी केली मदत -
आमदार महेश लांडगे याच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही दिवसांपासून जीवनावश्यक वस्तूचे संकलन सुरू केले होते. एक हात मदतीचा या वाक्यानुसार त्यांनी नगरसेवक, भाजप पदाधिकारी यांच्यासह नागरिकांना मदतीचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, राजकीय व्यक्तींसह नागरिकांनी भरभरून मदत केली. आणि गुरूवारी मध्यरात्री जीवनावश्यक वस्तूनी भरलेले 26 ट्रक पुरग्रस्तांच्या माहितीसाठी रवाना झाले. स्वतः महेश लांडगे हे त्याठिकाणी उपस्थित होते. अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.