मंचर (पुणे) - बैलगाडा मालकांवर दाखल झालेले खटले मागे घेण्याचा निर्णय घेणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. ते मंचर येथील ग्रामीण रुग्णालयायाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. जोपर्यंत वळसे आणि पाटील आम्ही सर्व एकत्र येत नाही, तोपर्यंत बैलगाडा मालकांचे शंका निरसन होणार नाही, असे वक्तव्य माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी यावेळी केले.
बैलगाडा शर्यत बंदी उठवावी यासाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे. परंतु बैलगाडा शर्यत बंदीचा मुद्दा आता तापला आहे. बैलगाडा मालक आक्रमक झालेले आहेत. शुक्रवारी (दि. २०) रोजी आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला गुंगारा देत झरे गावामध्ये बैलगाडा शर्यत भरविली होती. त्याला राज्यातील बैलगाडा मालकांनी पाठिंबा दिला, मात्र आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीदेखील गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघात बैलगाडा शर्यती भरावणार असल्याचे सांगितले आहे.
हेही वाचा-...तर बैलगाडा शर्यतीसाठी माझी राजकीय आत्महत्या करण्याची तयारी - खासदार अमोल कोल्हे
बैलगाडा शर्यत सुरू व्हावी, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू-
पुढे माजी खासदार आढळराव पाटील म्हणाले, की बैलगाडा शर्यत सुरू व्हावी, यासाठी केंद्र सरकारकडे खासदार डॉ. अमोल कोल्हे पाठपुरावा करत आहेत. तर कोणतेही राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन न्यायालयीन लढाई करून हा प्रश्न मार्गी लावण्याची गरज आहे. ही न्यायालयीन लढाई आहे. या सगळ्या गोष्टी बैलगाडा मालकांना समजून सांगण्याची गरज असल्याचे मत माजी खासदार आढळराव पाटील यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा- भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून बैलगाडा शर्यतीचे आयोजन; सांगलीतून थेट प्रक्षेपण
पुन्हा खटले दाखल होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन
यावेळी वळसे पाटील यांनी जिथे बैलगाडा मालकांवर खटले दाखल झाले असतील, ते खटले मागे घेण्याचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले. पण पुन्हा खटले दाखल होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा-अखेर धुराळा उडाला.. गोपीचंद पडळकरांनी गनिमीकाव्याने पार पाडल्या बैलगाडा शर्यती
आमदार गोपीचंद पडळकर यांनी 20 ऑगस्टला आटपाडी झरे येथे घेतली बैलगाडी शर्यत
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीला प्रशासनाचा विरोध होता. पोलिसांनी मोठा पोलीस फौजफाटा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या झरे (ता. आटपाडी, जिल्हा सांगली ) या गावी तळ ठोकून तैनात केला होता. तसेच नऊ गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. प्रशासनाची अशी जय्यत असतना देखील अखेर गनिमीकाव्याने आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडी शर्यत पार पाडली आहे. आटपाडीच्या झरे येथे पडळकर समर्थकांनी मैदानात बैलगाडी शर्यतीचे आयोजन करत विना लाठीकाठी बैलगाडी शर्यती पार पाडल्या.