बारामती (पुणे) - धनगर समाज आरक्षणासह युती सरकारने अनुसूचित जाती-जमातीच्या दिलेल्या 22 सवलती तत्काळ लागू कराव्यात. तसेच मेंढपाळांवरील हल्ले थांबवण्यासाठी त्यांना शस्त्र परवाने द्यावेत, अशा प्रकारच्या मागण्यांसंदर्भात आज (दि. 27 सप्टें.) सर्वपक्षीय धनगर समाजातील नेत्यांची धनगर समाज ऐक्य परिषद पार पडली. सरकाने आठ दिवसाने धनगर आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यास राज्यभर उग्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे झालेल्या या ऐक्य परिषदेत माजी मंत्री अण्णा डांगे, माजी आमदार रामराव वडकुते यांच्यासह शेकडो आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. या परिषदेत सर्वपक्षीय धनगर समाजातील नेत्यांनी एका झेंड्याखाली येऊन समाजाचे प्रश्न सोडवण्याचा निर्धार करण्यात आला. यामध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण असूनही त्याची अंमलबजावणी 1956 सालापासून होत नाही. भाजपाने दिलेल्या अनुसूचित जाती-जमातीच्या 22 सवलती तत्काळ लागू कराव्यात तसेच मेंढपाळ बांधवांवर हल्ले रोखण्यासाठी त्यांना शस्त्र परवाने देण्यात यावे, अशा मागण्या परिषदेत एक मुखाने संमत करण्यात आल्या.पुढील आठ दिवसांत राज्यात ठिकठिकाणी तीव्र आंदोलने करणार असल्याचे या परिषदेत निर्णय घेण्यात आला आहे. त्याची सुरुवात आजच्या या परिषदेची सांगता करत असताना राज्य मंत्रिमंडळाची यादी व अद्याप 22 सवलती लागू न केलेली सवलतीच्या यादीची होळी करण्यात आली. यावेळी उपस्थित समाजबांधवांनी सरकारचा निषेध नोंदवला.
हेही वाचा - 'फडणवीस व राऊत भेटीकडे राजकीयदृष्ट्या पाहणे गैर'