पुणे - राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात सुरू असलेल्या संघर्षावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखेर मौन सोडले आहे. संपूर्ण जग कोरोना संकटाचा मुकाबला करत आहे. अशावेळी आपला देश आणि देशातील जनता एकसंघ होऊन कोरोना संकटाशी सामना करत असल्याचे चित्र समाजात जाण्याची गरज आहे, असे अजित पवार म्हणाले. ते पिंपरी-चिंचवडमध्ये एका उड्डाणपुलाच्या उद्घाटनाप्रसंगी आले असता पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्य सरकार कोरोनाची स्थिती हातळण्यात अपयशी ठरले असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. तसेच विरोधकांनी अनेक राज्यपालांची भेट देखील घेतली आहे. तसेच नारायण राणे यांनी राज्यात राष्ट्रपती शासन लावण्याची मागणी केली. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर हल्लाबोल केला. केंद्राने किती मदत केली त्याची आकडेवारी फडणवीसांनी सांगितली. त्याला महाविकासआघाडीतील नेत्यांनी प्रत्युत्तरदेखील दिले. तसेच रेल्वे सोडण्यावरूनदेखील केंद्र आणि राज्यामध्ये वाद सुरू आहेत. त्यावरून देखील राज्य सरकारमधील अनेक नेत्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार आतापर्यंत काहीही बोलले नव्हते. आता त्यांनी मौन सोडत या स्थितीवर भाष्य केले आहे.
एकमेकांवर ढकलाढकली करण्यापेक्षा जगावर आलेले संकटाचा सामना करा. जगाने या संकटाचा मुकाबला करायचे ठरवलेले आहे. त्यावेळेस आपल्या देशातील जनता एकसंघ होऊन संकटाशी सामना करत आहे. अशाप्रकारे चित्र समाजात जाण्याची गरज आहे. त्यामुळे आम्ही आमच्या परीने जेवढ्या काही ट्रेन मागवून घेता येतील आणि पाठवता येतील त्या पाठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज ही ते काम सुरू आहे, असे अजित पवार म्हणाले.