बारामती - तालुक्यातील ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी गांभीर्याने काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सामाजिक अंतर ठेवणे, हात वारंवार धुणे, गर्दी टाळणे या त्रिसुत्रीवर भर देत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले. ‘कोरोना’ प्रतिबंधित लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
हेही वाचा - संसदेतील वाद आणि चर्चेचा खालवलेला दर्जा म्हणजे लोकशाही घसरण, व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली चिंता
लसीकरणाचा वेग वाढवा....
बारामती शहरात काही नागरिक मास्क वापरताना दिसत नाहीत. शासनाच्या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. बाजाराच्या ठिकाणी गर्दी करत आहेत. यावर प्रशासनाने कडक उपाययोजना करुन दंडात्मक कारवाई करावी. सार्वजनिक ठिकाणी तसेच अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल याची सर्वांनीच दक्षता घेणे आवश्यक आहे. लग्न समारंभ आणि अन्य कार्यक्रमासाठी शासनाच्या नियमानुसार लोकांची संख्या मर्यादित ठेवणे अपेक्षित आहे, याकडे विशेष लक्ष द्यावे. लसीकरणाचा वेग वाढवावा. सॅनिटायझरचा वापर करावा, कोविडशी लढण्याकरीता आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधन सामुग्रीची कमतरता भासणार नाही, याचीही प्रशासनाने खबरदारी घ्यावी असेही ते म्हणाले.
हेही वाचा - मराठा आरक्षणावरील सुनावणी पूर्ण, सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय
फिरत्या चित्ररथाची उपमुख्यमंत्री यांनी केली पाहणी....
जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत तसेच जैवविविधता पूरक गाव संकल्पना आणि कोरोना प्रतिबंधक जनगागृतीबाबत एलईडी मोबाईल व्हॅन (फिरता चित्ररथ) तयार केले आहेत. सदर चित्ररथाद्वारे बारामती तालुक्यात सध्या प्रसिध्दी करण्यात येत आहे, त्याची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. यावेळी डॉ. मनिष गायकवाड यांनी चित्ररथाच्या कार्यक्रमांची माहिती दिली.