पुणे - या सरकारचा हा प्रचंड मनाचा कद्रुपणा चालला आहे. आधी आमच्या काही लोकांची सुरक्षा काढून घेतली. त्यानंतर आधीच्या मंत्रिमंडळातील आमची जी स्थाने होती, ती काढून टाकली. आता राज्यपालांना विमान नाकारणे, हा अत्यंत छोट्या मनाचा कद्रूपणा आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे, हे सर्वसामान्य जनता पाहत आहे, असेही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.
हे महाभकास आघाडी सरकार -
सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांनी इतर देशाच्या लोकांनी आमच्या देशातील प्रश्नात लक्ष घालू नये, असे ट्विट त्यांनी केले. त्याची चौकशी हे सरकार करत आहे. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यामुळे सकाळीच मी ट्विटरवर या सरकारला महाभकास आघाडी म्हटले आहे, असेही पाटील यांनी म्हटले.
पोलिसांना स्वत:हून तक्रार दाखल करता येत नाही का -
पुण्यात एका तरुणीने आत्महत्या केली. तिच्या मोबाईलवरून तिचे एका माजी मंत्र्याबरोबर संबंध होते. तिच्या आत्महत्येला 48 तास झाले, तरी काहीही कारवाई झालेली नाही. या संदर्भात नातेवाईकांनी कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. परंतु पोलिसांना स्वत:हून तक्रार दाखल करता येत नाही का, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
मनसेने आपली भूमिका बदलावी -
आपला पक्ष कसा वाढवायचा याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. मनसेत जर अमराठी सामील होत असेल, तर चांगली गोष्ट आहे. तसेच मनसेने त्यांची अमराठी लोकांबाबतची भूमिका बदलली, तर त्यांच्याशी युती शक्य आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.