पुणे - नाशिक ओझर येथील विमानतळास कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. येत्या 9 ऑगस्ट रोजी आंबेडकरी जनतेच्या वतीने या मागणीसाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी पुण्यातील अल्पबचत भवन येथे राज्यव्यापी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
नाशिकमध्ये 9 ऑगस्ट महामोर्चा
नाशिक विमानतळास कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्यासाठी बऱ्याच वर्षांपासून मागणी होत आहे. परंतु, या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये रोष आहे. त्यासाठी पुन्हा एकदा त्या मागणीने जोर धरला आहे. त्यासाठी येत्या 9 ऑगस्ट रोजी नाशिक येथील महामोर्चात महाराष्ट्रातील सर्व पक्ष संघटनातील नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, अशी माहिती रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांनी दिली आहे. यावेळी कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी नागरिकांनी खबरदारी घेऊन सहभागी व्हावे, असे आव्हानही त्यांनी केले आहे.
'पक्ष भेद बाजूला ठेवा'
पक्ष भेद बाजूला सारून सर्वांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. या मागणीबाबत राज्याने प्रस्ताव मंजूर करून केंद्राकडे पाठवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देण्यात येणार आहे. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नाशिक विमानतळास कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर करून तो केंद्राकडे पाठवावा अशी मागणीही या महामोच्याच्यावेळी करण्यात येणार आहे. असे माजी आमदार जयदेव गायकवाड यांनी सांगितले आहे.