पुणे - जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचे आणि शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करू न दिल्यामुळे आता विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मात्र, देहू संस्थानचे ( Dehu Sansthan ) अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, भाषणाबाबत मलाही कोणतीच कल्पना नव्हती. भाषण कोण करणार कोण नाही हे सर्व दिल्लीतून आलेल्या प्रोटोकॉलनुसार ठरले होते. मात्र, वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमात कोणतेही राजकारण करू नये, असे वाटते.
देहूत पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांच्या हस्ते शिळा मंदिर आणि जगद्गुरु संत तुकाराम महारांज यांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा मंगळवारी (दि. 14 जून) पार पडला. यावेळी व्यासपीठावरून देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी भाषण केले त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी वारकऱ्यांना संबोधित केले. त्यांच्यानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करण्यास उठले. त्यामुळे अजित पवार यांना भाषण करण्यास दिले नाही का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. यावरून राष्ट्रवादी पक्ष आक्रमक झाला असून हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
अजित पवार यांना भाषण करू न दिल्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. आता देहू राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. देहुच्या मुख्य चौकात आंदोलन करून आचार्य तुषार भोसले यांचा निषेध नोंदविण्यात आला. आचार्य तुषार भोसले यांच्याकडे सर्व व्यवस्था असल्यामुळे त्यांनी जानून बुजुन अजित पवार यांना भाषण करू न दिल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.