पुणे - चैत्रशुद्ध तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा देव्हाऱ्यातून बाहेर आणून तिला खण, गाठी, गजरा घालून दररोज पूजा केली जाते. त्यालाच अन्नपूर्णा चैत्रगौर असे म्हणातात. एक महिना म्हणजेच अक्षयतृतीयेपर्यंत हा सण चालतो. त्यानिमित्ताने गामदैवत कसबा गणपीसमोर अन्नपूर्णा चैत्रगोर व गणेशाला आकर्षक सजावट करण्यात आली. असेच पैठणी साडीची आकर्षक रांगोळी काढून मंदिर फुले व दिव्यांनी देखील सजविण्यात आले आहे.
ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थानतर्फे ही सजावट करण्यात आली होती. मंदिरात ज्या वहिवाटदार पुजाऱ्यांकडे हा महिना सेवेचा असतो, त्यापैकी यंदा आशापूरक उर्फ प्रमोद ठकार यांनी श्री गणेशाची पूर्ण पोषाखाने पूजा साकारली. देवीला साडी-वस्त्र नेसवून पूजा करुन आरास मांडण्यात आली होती. मंदिराचे प्रमुख विश्वस्त विनायक ठकार, शरदचंद्र ठकार, शैलजा ठकार यांनी मार्गदर्शन केले. सीमा ठकार यांनी पैठणी साडीची आकर्षक रांगोळी रेखाटली. सजावटीसाठी आंबे, द्राक्षे, कलिंगड, खरबूज, पपई, चिकू आदी फळे मांडण्यात आली होती. देवीसमोर कैरीची डाळ, पन्हे, हरभऱ्याची उसळ व लाडू-करंजीचा नैवेद्य दाखविण्यात आला. याशिवाय फुलांची आकर्षक आरास व विद्युतरोषणाई देखील करण्यात आली होती.