पुणे - औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून चांगलाचेच राजकारण तापले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली आहे. स्थानिक नागरिकांना विचारात घेऊन हा नामांतराचा निर्णय घेतला जावा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय दुर्गराज गड-किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळा पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात पार पडला यावेळी ते बोलत होते.
स्थानिकांना विचारात घ्यावे -
सध्या नामांतरणाचा विषय खूपच तापत आहे. औरंगाबाद शहराचे नामांतरण संभाजीनगर करण्यात यावे यावरून शिवसेना आणि भाजपमधील काही नेते एकमेकांवर टीका करत आहे. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने नामांतराला विरोध केला असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यावर काही भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मात्र वेगळीच भूमिका मांडली आहे. औरंगाबाद शहराचे नामांतरण करत असताना तेथील स्थानिक नागरिकांना विचारात घेऊन हा नामांतरणाचा निर्णय घेण्यात यावा, असे माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला वाटते, असे मत यावेळी रोहित पवार यांनी व्यक्त केले.
योग्य ती कारवाई केली जाईल -
भंडाऱ्यात झालेली घटना ही अतिशय दुःखद असून जर याबाबत सरकार खोलात जाऊन चौकशी करणार आहे. यात कोणी दोषी असतील तर त्यांच्यवर योग्य ती कारवाई करण्यात केली जाईल, असेही यावेळी पवार म्हणाले.
पक्ष जी जबाबदारी देईल ती पूर्ण करणार -
राज्यात महापालिकेच्या निवडणुकीचे वारे आता पासूनच वाहू लागले आहे. पक्ष जो जबाबदारी देईल ती मी पार पाडेल, असेही ते म्हणाले. महाविकास आघाडी एकत्र लढली, तर एकत्रित काम करू, अन्यथा पक्षाचे काम करावे लागेल, असे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले.
महिलांच्या बाबतीत होत असलेल राजकारण थांबले पाहिजे -
राष्ट्रवादीचे पदाधिकारी मेहबूब शेख यांच्यावर लैगिक अत्याचाराचा आरोप होत आहे. यावर प्रश्न विचारला असता महिलांच्या बाबतीत होत असलेले राज्यातील राजकारण थांबले पाहिजे, जो पर्यंत पोलिसांचा रिपोर्ट येत नाही, तो पर्यंत बोलणे योग्य नसल्याचेही रोहित पवार म्हणाले.
हेही वाचा - सिराज आणि जसप्रीतला ऑस्ट्रेलियात करावा लागला वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना