पुणे - शहरात कोरोनाचा आरटीपीसीआर तपासणीचा बनावट रिपोर्ट तयार करून देणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या्प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या जिनपॅथ डायग्नोस्टीक इंडीया प्रा.लि. या लॅबच्या नावाने हा बनावट अहवाल देण्यात येत होता.
सागर अशोक हांडे (वय 25 रा मुखेड तालुका जि. नांदेड) आणि दयानंद भीमराव खराटे (वय 21, कळंब तालुका जि. उस्मानाबाद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. जिनपॅथ डायग्रोस्टीक इंडीया प्रा.ली च्या नावाने बनावट कोवीड आरटीपीसीआर अहवाल देत असल्याची तक्रार व्यवस्थापकांनी केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. कारवाईत डेक्कन पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून इतर आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. दरम्यान अशा प्रकारे कोणत्याही अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवून कोविड चाचणी न करता मान्यता प्राप्त लॅबमधुनच चाचणी करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.