पुणे - किल्ले शिवनेरीवर पुन्हा एकदा अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. बुधवारी (दि. 4 मार्च) दुपारी शिवनेरी किल्ल्यावरील कडेलोट तटबंदीच्या पश्चिम बाजूस अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. हा मृतदेह 30 ते 35 वर्ष वयाच्या व्यक्तीचा असून 4 ते 5 दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज ट्रेकर्स व वनविभागाने व्यक्त केला आहे.
किल्ले शिवनेरी गडावर शिवजयंतीनंतर चार दिवसांनी एका अज्ञात तरुणाचा मृतदेह पाण्याच्या टाकीत आढळून आला होता. त्यातच आज दुसरा मृतदेह गडाच्या तटबंदीजवळ व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
शिवनेरी गडाच्या तटबंदीजवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याचे समोर आल्यानंतर वनविभागाच्या रेस्क्यू पथकातील सदस्य, वनरक्षक रमेश खरमाळे, वनपाल शशिकांत मडके, वनरक्षक नारायण राठोड, किरण बाणखेले व विवेक पिंगळे यांनी तटबंदीजवळील निसरट्या वाटेवरुन दोर लावून मृतदेह बाहेर काढला. यावेळी मोठी कसरत करावी लागली. घटनेचा तपास लावण्यासाठी जुन्नर पोलिसांसमोर मोठे आवाहन असणार आहे.
हेही वाचा - VIDEO : दुचाकीसह महिलेने घेतले महादेवाचे दर्शन, व्हिडिओ व्हायरल