पुणे- सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून मुठा नदीत दोन तरुण वाहून गेले होते. ही घटना शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) घडली होती. या दोघाही तरुणांचे मृतदेह आज सकाळी सापडले आहेत.
एकाचा मृतदेह संगम ब्रिज जवळील नदीपात्रात, तर दुसऱ्याचा नाना नानी पार्क घाटात सापडला आहे. दोघांचीही ओळख पटली असून डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये घटनेची नोंद करण्यात आली आहे. ओम तुमप्पा तुपधर (वय १८) आणि सौरभ सुरेश कांबळे (वय २०) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
शुक्रवारी सायंकाळी सौरभ आणि ओम हे दोघेही मित्रांसोबत भिडे पुलावर आले होते. त्यांनी मुठा नदीपात्राच्या कडेला जाऊन सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात असताना सदर तरुणांपैकी एकाचा पाय घसरला आणि तो नदीत वाहून जाऊ लागला. त्याला वाचवण्यासाठी दुसरा तरुण गेला असता तोही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता.
शुक्रवारी सायंकाळपासून अग्निशामक दलाचे जवान आणि एनडीआरएफचे जवान त्यांचा शोध घेत होते. आज सकाळी दोन्ही तरुणांचे मृतदेह सापडले. नाना नानी पार्क जवळील घाटात सौरभचा, तर संगम ब्रिज जवळील नदीपात्रात ओमचा मृतदेह आढळला. दोन्ही मृतदेहांची ओळख पटली असून दोघांचेही मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
हेही वाचा- पिंपरी-चिंचवड शहरातून महागड्या दुचाकी चोरणाऱ्या टोळीला अटक, कर्नाटकच्या दोघांचा समावेश