बारामती (पुणे) - लाकडी-निबोंडी योजना फार जुनी आहे. त्या योजनेचे पाणी पूर्वीच आरक्षित झाले आहे. कारण नसताना कुणी गैरसमज करून घेऊ नये. याबाबतच्या जुन्या फाईली झाकुन राहत नाहीत. सोलापूरकरांना याबाबत समजुन सांगण्याचं काम जलसंपदा विभागाला करावे लागेल. याबाबत सन्मवयाची भूमिका घ्यावी लागेल, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजना फार जुनी - बारामती येथे शनिवारी (दि. १४) विविध विकासकामे पहाणी दौऱ्यामध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पवार पुढे म्हणाले, लाकडी-निंबोडी योजनेची वर्क आॅर्डर निघाल्यानंतर सोलापून जिल्ह्यातील काही सहकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. अगदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी देखील यावर आक्षेप नोंदवला आहे. इंदापूरसाठी जी नवी योजना करायची होती त्यावर वाद झाल्याने ती थांबली. मात्र, लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजना फार जुनी आहे. या योजनेचे पाणी मागेच आरक्षित करण्यात आले होते. त्यामुळे आता ज्यांचा गैरसमज झाला आहे. त्यांना समजावून सांगण्याचे काम जलसंपदा विभागाला करावे लागणार आहे. या पाण्याचे शेतीला, पिण्यासाठी, उद्योगधंदे यासाठी पूर्वीच वाटप झाले आहे. जुन्या फाईली काही झाकून राहत नाहीत.
सोलापूरच्या लोकांची समजूत काढू - सोलापूरमधील सर्वच पक्षाच्या लोकांशी बोलून हा वाद मिटवण्यात येईल.त्याच्याबाबत अगदीच टोकाची भूमिका घेऊन चालणार नाही. सन्मवयाची भूमिका घेणे गरजेचे आहे. उजनीमध्ये निरा नदीचे ७ टीएमसी पाणी वळवण्या आले आहे. ही योजना मीच मंजुर केली होती. हे पाणी उजनीमध्ये देत असताना त्यावेळी इकडच्या लोकांनी त्याला विरोध केला नाही. त्यांनी समंजस भूमिका घेतली. त्यामुळे पाणी कसे आरक्षित झाले आहे, याची माहिती घेऊन बोला. तो तुमचा अधिकार आहे. पाणी सर्वांंचेच आहे. धरणे सर्व पूणे जिल्ह्यात आहेत. मात्र वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून पाणी अनेक जिल्ह्यांना जाते. त्यामध्ये कोणीच टोकाची भूमिका घेत नाही. याबाबतचा विचार सर्व शेतकऱ्यांनी करावा. यामधून नविन प्रश्न निर्माण होणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असेही यावेळी अजित पवार म्हणाले.