पुणे (दौंड) - तालुक्यातील खोर गावातील डोंबेवाडी येथील समीर डोंबे या युवकाने आधुनिक शेती करणाऱ्या तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. पारंपरिक पिकांमधूनच राष्ट्रीय बाजारात आपले समीर याने नाविन्यपूर्ण असे फिग जॅम (अंजिरापासून तयार केलेला जाम ) प्रॉडक्ट लाँच केले आहे. या जॅमला सध्या बाजारपेठेत चांगली मागणी आहे. त्यामुळे उत्पादनाला चांगले पैसेही मिळत आहेत.
मोठ्या शहरांतील मॉलला पुरवठा-
दौंड तालुक्यातील डोंबेवाडी येथील शेतकरी पारंपरिक पीक म्हणून अंजीर लागवड करून आपला उदरनिर्वाह करत होते. डोंबे यांच्या घरात तीन पिढ्या अंजीर हे पीक घेतले जाते. अंजीर विक्रीसाठी शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध होत नव्हती. आणि उत्पादनालाही चांगला भाव मिळत नव्हता. त्यामुळे अंजीर उत्पादक शेतकरी भरडला जात होता. त्यामुळे आता आधुनिक शेती केली पाहिजे असा निश्चय समीर याने केला आणि भाऊ चंद्रशेखर डोंबे यांच्यामार्फत आधूनिक शेतीची संकल्पना समजावून घेतली. समीरचे शिक्षण बी टेक फूड सायन्स मधून झाले आहे. समीरने शेतकऱ्यांना अगदी हाकेच्या अंतरावर बाजारपेठ निर्माण केली. त्यामुळे बऱ्याच अडचणी पासून शेतकऱ्यांची सुटका झाली. उत्तम फळांची प्रतवारी करून त्यांना मुंबई, पुणे, ठाणे, शहरांबरोबरच संपूर्ण महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र बाहेरील मॉलला पुरवठा केला जातो.
जॅम लोकप्रिय प्रोडक्ट-
आता तर अगदी परराज्यातही अंजिराचे जाम आणि अंजीर पाठवले जातात. जाम हा प्रॉडक्ट खूप लोकप्रिय झाला असून याची मागणी शहरी भागातून खूप होत आहे. ज्यामुळे लोकांना केव्हाही अंजिराची चव चाखता येते व त्यापासून मिळणारे गुण सत्वे सहजतेने उपलब्ध होत आहेत.
जेली आणि चॉकलेट बनवणार-
लॉकडाऊन आणि त्या नंतरच्या काळात त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात अंजीर व अंजिराचे जाम यांची विक्री करण्यात आली. विविध सामाजिक उद्योजकता पुरस्काराने देखील त्यांना आदर्श तरुण उद्योजक म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. भविष्यात फिग् जेली व फिग् चॉकलेट सारखे पदार्थसुद्धा बनवणार असल्याची माहिती समीरने दिली.