दौंड (पुणे) - तालुक्यातील केडगाव येथील मोहन हॉस्पिटल मध्ये रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. मोहन जनरल हॉस्पिटलची चौकशी करण्याची सूचना दौंडच्या तहसीलदारांनी अन्न आणि औषध प्रशासनाला केली आहे. या संदर्भात तहसिल कार्यालयाने अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तांना पत्र लिहिले आहे. याबाबत रुग्णाच्या नातेवाईकांनी कारवाईची मागणी केली होती.
"मोहन जनरल हॉस्पिटलमध्ये रूग्णांवर उपचारासाठी लाखो रुपये बिल आकारले जात आहे. तसेच रूग्णालयातील डॅाक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आणि रूग्णांवर योग्य उपचार न केल्यामुळेच नातेवाईकाचा मृत्यु झाला असून त्यास मोहन जनरल हॉस्पिटल जबाबदार आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी" अशी मागणी वासुंदे येथील निलेश जांबले केली होती.
त्यानुसार तहसीलदार संजय पाटील यांनी गुरूवारी पुणे अन्न व औषध विभागीय आयुक्तांना चौकशी करण्याचे पत्र दिले आहे. या रूग्णालयातील मेडीकलची बिले, कर्मचारी यांची चौकशी करून दोषी डॅाक्टर व कर्मचारी यांची कायदेशीर चौकशी करण्यात यावी. तसेच तक्रार अर्जाची चौकशी करून, चौकशी पुर्ण झाल्यावर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तहसीलदार यांच्या कार्यालकडे सादर करावा, असे पत्रात नमुद केले आहे.