पुणे - राज्य मंत्रीमंडळाचा आज विस्तार झाला. यामध्ये पुणे जिल्ह्याला झुकते माप देण्यात आले. राष्ट्रवादीकडून पुणे जिल्ह्यातील ३ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची, दिलीप वळसे पाटील आणि दत्ता भरणे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. दत्ता भरणे इंदापूरचे आमदार असून, त्यांना मंत्रीपद देऊन अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांना जोरदार धक्का दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने दत्ता भरणे यांना मंत्रीपद देत बारामती लोकसभा मतदारसंघातील राजकिय समिकरण घट्ट केली आहेत. धनगर समाजाला प्रतिनिधित्व दिले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादीचे दत्ता भरणे यांच्यात कायम संघर्ष राहिला आहे. भरणे यांच्या उमेदवारीवरुन झालेल्या वादामुळे हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, या विधानसभेत हर्षवर्धन पाटील यांचा भरणे यांनी पराभव केला. 2014 च्या निवडणुकीतही त्यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. तेव्हापासूनच अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातली दरी आणखी वाढली होती.
अजित पवारांचे निकटवर्तीय अशी भरणे यांची ओळख आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्तीय बँकेचे विद्यमान संचालक तसेच इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपदही त्यांनी काही काळ भूषविले होते. सध्या कारखान्याचे ते संचालक आहेत. दरम्यान, नुकत्याच पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातली जवळीक अनेकांना आश्चर्ययाचा धक्का देऊन गेली होती. या संपूर्ण कार्यक्रमात अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात गुजगोष्टी सुरू होत्या. त्यामुळे काही नवी समीकरणे जुळणार का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. मात्र, इंदापूरमधील दत्ता भरणे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने हर्षवर्धन पाटील यांना हा एक मोठा धक्का असणार आहे. आगामी राजकारणात याचे पडसाद उमटताना दिसतील. दत्ता भरणे यांच्या मंत्रीपदाच्या निमित्ताने अजित पवारांनी हर्षवर्धन पाटील यांना आणखी एक धोबी पछाड दिलीय, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.