पुणे - बांधकाम व्यवसायावर मंदीचे सावट असल्याने वीटभट्टी व्यावसायिकही आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अशातच आता अवकाळी पावसाचा फटकाही या व्यावसायिकांना बसला आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या ढगफुटीजन्य पावसामुळे वीट भट्टीत तयार झालेल्या कच्च्या मालाच्या विटा भिजून मोठे नुकसान झाले आहे.
शेतीसह जोडव्यवसाय संकटात...
जुन्नर,आंबेगाव, खेड ,शिरूर तालुक्यात दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हाहाकार केला आहे. त्यामध्ये शेतीसह, शेतमाल ,फळबागा, भाजीपाला ,तरकारी मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला. तर दुसरीकडे शेतीला जोडव्यवसाय म्हणून वीटभट्टीचा व्यवसाय करत असताना अचानक सुरू झालेल्या पावसाने तयार झालेल्या विटांचा माल भिजून मोठे नुकसान झाले आहे.
वीटभट्टी व्यावसायिकांसह मजुरांना सर्वाधिक फटका...
मराठवाडा, विदर्भ परिसरातून आलेली अनेक कुटुंबे वीटभट्टीवर काम करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दिवसभर मातीचा चिखल पायाने तुडवीत ते मातीला आकार देऊन विटा तयार करतात. तयार झालेल्या या विटा उन्हात वाळवल्या जातात, नंतर विटांचा कच्चा माल कोळसा भट्टीत भाजला जातो. मात्र सध्या सुरू असलेल्या पावसामुळे ही सर्व मेहनत वाया गेली आहे.
वीटभट्टीवर मंदीचे सावट
राजगुरूनगर, आंबेगाव, आळेफाटा, नारायणगाव, जुन्नर, शिरूर या परिसरात विटांचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. मोठे भांडवल उभे करून वीटभट्टी चालवली जाते मात्र या व्यवसायावर कोरोना महामारीच्या संकटानंतर मंदीचे सावट उभे राहिले आहे. त्यातूनही उभारी घेण्यासाठी विटभट्टी व्यावसायिक मजुरांच्या मदतीने पुन्हा नव्याने विटा तयार करत असताना अचानक पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे विटांचे मोठे नुकसान झाले आहे
हेही वाचा - बुलडाण्यात चारचाकी-दुचाकीच्या जोरदार धडकेत पती-पत्नी ठार!