पुणे - कोरोना संसर्ग आणि त्यानंतर झालेला लॉकडाऊन, सामाजिक स्तरावर एकत्र येण्यास येत असलेल्या मर्यादा, याचा मोठा परिणाम शैक्षणिक संस्थांवर झाला आहे. सोशल डिस्टन्सिंगमुळे शाळा-महाविद्यालये सुरू होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन शिक्षण हा पर्याय समोर आला आहे. अनेक शाळा आणि महाविद्यालयात ऑनलाइन शिक्षणाला सुरुवातही झाली आहे. मात्र, ऑनलाइन शिक्षण पद्धतीत सायबर गुन्हे वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिक्षण ऑनलाइन झाल्याने मुलांना लहान वयातच मोबाईल, लॅपटॉप व कॉम्प्युटर जास्त प्रमाणात हाताळण्यास मिळत आहे. शाळेकडून तासिकांची येणारी लिंक पाहण्यासाठी व इतर शालेय अॅक्टिव्हिटीसाठी मुलांकडे वेगवेगळे सोशल अकाऊंट असणे आवश्यक झाले आहे. सोबतच ईमेल अकाऊंटही तयार करावे लागत आहेत. अगदी लहान वयात ही मुले सोशल प्लॅटफॉर्मवर आली आहेत आणि त्यामुळे सायबर सुरक्षेचे भान राखणे गरजेचे झाले आहे. ऑनलाइन हऱ्यासमेंट, डेटा थेफ्ट, व्हायरस अटॅक, असे प्रकार होण्याची भीती वाढली असल्याचे मत सायबर तज्ञ व्यक्त करत आहेत.
शाळाकडून मुलांना लिंक पाठवल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या लिंक तपासून घेणे महत्त्वाचे आहे. काही लोक बेकायदेशीर कृत्य करत चुकीच्या लिंक विद्यार्थ्यांना पाठवून त्या मार्फत मोबाईल, लॅपटॉपवर व्हायरस पाठवू शकतात. यातून मुलांचे सोशल मीडिया अकाऊंट, पालकांचे लॅपटॉप किंवा मोबाईलमधील डेटाही हॅक होण्याची भीती आहे, असे मत सायबर तज्ञ अतुल कहाते यांनी व्यक्त केले.
मुले ज्यावेळी ऑनलाइन असतील तेव्हा पालकांनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे. मुलांचे ऑनलाइन रॅगिंग ज्याला ऑनलाइन बुलिंगचे प्रकार किंवा मानसिक त्रास देण्याचे प्रकार होत नाहीत ना? हे पाहणे गरजेचे आहे. या सोबतच ऑनलाइन शिक्षण घेत असताना सर्वमान्य असलेली अधिकृत अॅप वापरली जात आहेत की नाही? हे पाहणेही महत्त्वाचे आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे पालकांवरची जबाबदारी अधिकच वाढली आहे.