पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असून शहरातील काही परिसर आज मध्यरात्रीपासून सील करण्यात येणार असल्याची माहिती महानगर पालिका प्रशासनाने दिली आहे. शहरातील करोना बाधितांची आकडेवारी वाढू नये, यासाठी संबंधित निर्णय घेण्यात आला असून आज मध्यरात्री बारा वाजल्यापासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. आत्तापर्यंत १२ जणांना करोनामुक्त करण्यात डॉक्टरांना यश आले असून काही जणांवर अद्याप महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील चार परिसर सील करण्यात येणार असून त्यामध्ये १) घरकुल रेसीडेन्सी बिल्डिंग क्र.ए १ ते २० चिखली. (पवार इंडीस्ट्रीयल परीसर नेवाळे वस्ती), २) जामा मस्जिद खराळवाडी हा परीसर (गिरमे हॉस्पिटल, अग्रेसन लायब्ररी, क्रिश्ना ट्रेडर्स, चैताली पार्क हौसिंग सोसायटी गारईडन, ओम हॉस्पिटल, ओरीयंटल बँक, सीटी प्राईड हॉटेल, क्रिस्टल कोर्ट हॉटेल, गिरमे हॉस्पिटल) ३) कमलराज बालाजी रेसीडन्सी, रोडे हॉस्पिटल जवळ, दिघी,भोसरी (रोडे हॉस्पिटल, एसव्हीएस कॉम्प्युटर, स्वरा गिप्ट शॉपी, साई मंदीर रोड अनुष्का ऑप्टिकल शॉप, रोडे हॉस्पिटल) आणि ४) शिवतीर्थ नगर, पडवळनगर थेरगाव (शिरोळे क्लिनिक, गणेश मंदीर, निदान क्लिनिक, किर्ती मेडीकल, रेहमानिया मस्जिद, ऑकिड हॉस्पिटल, अशोका सोसायटी रोडवरील गणपती मंदीर ते शिरोळे क्लिनिक) या परिसराचा समावेश आहे.
पालिकेच्या आदेशानुसार या परिसराच्या हद्दीत पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी असणार आहे. तसेच घराबाहेर पडण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क अथवा घरगुती स्वच्छ धुतलेला कापडी रुमाल लावणे बंधनकारक केले आहे. तसेच आदेशामधील निर्बंधातून जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याऱ्या व्यक्तींना यातून वगळण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिलीय.