सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परिसर हिरवाईने नटलेला परिसर आहे. २२ मे हा आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन आहे. त्यानिमित्ताने 'ईटीव्ही भारत'चा हा एक विषेश रिपोर्ट-
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परिसर हिरवाईने नटलेला परिसर आहे. येथे अनेक विविध झाडा-झुडुपांनी हा परिसर बहरलेला आहे. येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह, येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कायम या हिरवाईचे आकर्षण राहिले आहे. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला, की रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेले झाडं प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतात. या झाडांच्या पाना-फुलांचा सडा कायम रस्त्यावर पडलेला असतो. त्याने रस्तेही कायन नटलेले दिसतात. यातील कित्येक झाडं १०० ते १२० वर्ष जूनी आहेत. हा विद्यापीठ परिसर जवळपास चारशे एकरात पसरलेला आहे. ब्रिटिश काळात लावण्यात आलेले पतंगीची झाडं आजही या परिसरात मोठ्या डोलाने उभी आहेत. मुख्य इमारतीसमोर असणारे गोरखचिंचेचे झाडही अनेक वर्ष जुनं झाड आहे. आजच्या घडीला विद्यापीठात ७०० हून अधिक प्रजातींच्या वनस्पती आढळून येतात.
५० ते ५५ हजार झाडे
पुणे महापालिकेने केलेल्या वृक्षगणनेत विद्यापीठात एकूण ५० ते ५५ हजार झाडे आढळून आली आहेत. त्यातील साधारण ४०० झाडे औषधी वनस्पतीची आहेत. या औषधी वनस्पतींमध्ये मधुमेहावर उपयोगी असणारी 'सप्तरंगी' ही वनस्पती आहे. तसेच, दशमुळारिष्ठ, सीताअशोक, बारतोंडी, देवबाभूळ याही वनस्पती आहेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या अनेक वनस्पतींची लागवडही येथे करण्यात आलेली आहे. तर, गुळवेल लागवडीसारखा मोठा प्रकल्पही इथे हाती घेण्यात आला आहे.
दुर्मीळ वनस्पतींचे भांडार
चांदकुडा, युरोपियन ऑलिव्ह, पाडळ, अग्निमंथन अशी अनेक प्रदेशनिष्ठ दुर्मीळ वनस्पती आहेत. वड, पिंपळ, उंबर यांच्याही अनेक प्रजाती विद्यापीठात पाहायला मिळतात. त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या प्रकारची फुलं असणारी झाडं इथे सर्वांचे आकर्षण ठरतात.
बांबू पार्क
विद्यापीठाने बांबूची लागवड करत त्यापासून अनेक वस्तू बनविण्याचा प्रकल्पही उभा केला आहे. तसेच, येत्या काळात नवीन बांबू पार्कदेखील उभारण्यात येणार आहे.
वन्यजीव संपदा
विद्यापीठात बिनविषारी साप ते कोब्रापर्यंत शेकडो नाग व साप आढळून येतात. त्याचबरोबर हरणटोळ, धामण, मांजऱ्या, विविध पाली, सरडे, विंचू, कोळी, नाकतोडेही आहेत. तर, औषधी वनस्पती बागेत राखीबगळा, टिटवी, शेकाट्या, हरीयाल, पोपट, कोकीळ, भारद्वाज, खंड्या, पान कोंबडी, रान कोंबडी, सातभाई, हॉर्नबिल असे अनेक दुर्मीळ पक्षीही आहेत. तसेच, फुलपाखरंही मोठ्या प्रमाणात येथे आहेत. यामुळे विद्यापीठात प्राणी-पक्षी यांचा नैसर्गिक वावर आहे. मॉर्निंग वॉक आणि ओपन जिमच्या निमित्ताने हजारो नागरिक येथील नैसर्गिक वातावरणाचा रोज आनंद घेताना दिसतात.
हेही वाचा - 'वैद्यकीय परीक्षा रद्द करणे नियमानुसार योग्य नाही'