पुणे - फेसबुक या समाज माध्यमावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या 54 जणांविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव अॅड. प्रदीप गावडे यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.
हेही वाचा - पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी सायबर पोलीस ठाण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची बदनामी केल्याप्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर आता पुन्हा अॅड. प्रदीप गावडे यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, स्मृती इराणी यांच्यासह भाजपचे आणखी काही नेत्यांवर फेसबुक या समाजमाध्यमावर खालच्या दर्जाच्या, अपमानकारक आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट केल्या जात आहेत. काही पोस्ट या धमक्या देणाऱ्या, तर काही पोस्ट बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या आहेत. या पोस्ट "एक कोटी अजित पवार आणि सुप्रिया सुळे समर्थक" व "कार्य शिवसेनेचे" या फेसबुकवरील ग्रुप वर करण्यात आले आहे. तर, काही व्यक्तिगत प्रोफाईलवरून करण्यात आल्या आहेत. सायबर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
हेही वाचा - रमजान ईद साध्या पद्धतीनेच साजरी करा - मौलाना शबी अहसन काझमी