पुणे - राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड आणि ऑक्सिजन मिळत नसल्याची स्थिती आहे. पुण्यातदेखील कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला आहे. रुग्णांची होणारी फरपट, त्यांच्या नातेवाईकांना होणारा मनस्ताप थांबवण्यासाठी व रुग्णांना वेळीच योग्य उपचार मिळावेत यासाठी रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी आईचे व पत्नीचे दागिने गहाण ठेवून धानोरी येथे कोविड रुग्णालय सुरू केले आहे. ऑक्सिजन बेडची सुविधा असणारे एकूण ५३ बेडचे 'छत्रपती शिवाजी महाराज कोविड हॉस्पिटल' रुग्णांसाठी फायद्याचे ठरत आहे.
पस्तीस तोळे दागिने गहाण ठेवून सुरू केले कोविड हॉस्पिटल -
पुणे शहरात वाढत असलेल्या कोरोनामुळे शहरातील अनेक रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध होत नाहीत. काही रुग्णालयांमध्ये एका बेडवर तीन-तीन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशा परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज कोविड रुग्णालयासाठी स्वतःच्या पत्नी आणि आईचे पस्तीस तोळे दागिने गहाण ठेवून चव्हाण यांनी तीस लाख रुपयांची जुळवाजुळव केली.
अनेक मित्रांनी दिला मदतीचा हात -
रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने अवघ्या सात दिवसात जिद्दीच्या जोरावर ही कामगिरी केली. यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या विधायक कामासाठी जवळच्या मित्रांनीही मदतीचा हात पुढे केला.
३३ ऑक्सिजन बेड आणि २० जनरल बेड -
छत्रपती शिवाजी महाराज कोविड हॉस्पिटलमध्ये ३३ ऑक्सिजन बेड व २० जनरल बेडची सुविधा उपलब्ध आहे. डॉ. सलीम आळतेकर, डॉ. किशोर चिपोळे, गिरीश घाग, कुणाल टिंगरे, अपर्णा साठे यांनी हे हॉस्पिटल उभारण्यात मोलाची कामगिरी बजावली. पुणे मनपाचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती आणि माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे तसेच डॉ. अमोल देवळेकर यांनी या कोविड हॉस्पिटल उभारण्यासाठी खूप मदत केली. रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे रुग्णांना इतर रुग्णालयात योग्य व माफक दरात चांगली सेवा देण्याचे काम केले. या रुग्णालयाच्या माध्यमातूनही योग्य व माफक दरात चांगली सेवा देण्यात येणार आहे, अशी माहिती उमेश चव्हाण यांनी दिली.