पुणे - लॉकडाऊन काळात बंद असलेल्या न्यायालयाच्या कामकाजाला आज ८ जूनपासून सुरुवात झाली आहे. शिवाजीनगर न्यायालय आजपासून सुरू झाल्याने न्यायालयात कर्मचारी, वकील यांची पहिल्याच दिवशी गर्दी दिसून आली. तसेच घालून दिलेल्या नियमांनुसारच न्यायालयाचे कामकाज चालणार आहे.
देशात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातही राज्यात मुंबई आणि पुण्यामध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे शहरात काटेकोरपणे लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार न्यायालयासह सर्वकाही बंद होते. मात्र, आता लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली. तसेच काही नियम घालून देण्यात आले आहे. त्यानुसार आज ८ जूनपासून न्यायालयाच्या कामकाजाला सुरुवात झाली. न्यायालयात जाताना सॅनिटायझरने हात साफ करून मास्कचा देखील वापर केला जात आहे. तसेच न्यायालयात कामकाज ठरविक वेळतच सुरू ठेवता येणार आहे. या काळात तातडीच्या प्रकरणांमध्ये सुनावणी घेतली जाणार आहे. तसेच ज्या वकिलांचे काम असेल त्यांनाच न्यायालयात प्रवेश असेल. पक्षकारांना न्यायलायत प्रवेश दिला जाणार नाही.