पुणे - हडपसर येथील 'ओपन डम्पिंग' प्रकल्प बंद करावा. महापौरांनी शहरात अन्यत्र कुठेही कचरा प्रकल्प सुरू करावा, या मागणीसाठी आज महापौर कार्यालयात आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक योगेश ससाणे आणि स्थानिक नगरसेवक अशोक कांबळे यांनी हे आंदोलन केले.
हडपसर रामटेकडी येथे पुणे महानगरपालिकेकडून 16 ऑगस्टपासून ओपन कचरा डम्पिंग सुरू आहे. बावीस हजार टन अनप्रोसेस कचरा प्लॉट क्रमांक 87 मध्ये टाकला जात आहे. याला विरोध म्हणून त्या ठिकाणच्या औद्योगीक परिसरातील सर्व सभासद, शेजारी असलेल्या वसाहती तसेच रामटेकडी परिसरातील स्थानिक नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन दिवसांपासून कचऱ्याच्या गाड्या अडवल्या गेल्या. मात्र, तरीही महानगरपालिका प्रशासनाने काहीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे नगरसेवक योगेश ससाणे थेट महापौर कार्यालयात कचरा घेऊन आले.
महानगरपालिका हडपसरला कचरा नगरी करणार आहे का? हे योग्य नाही. आम्ही याचा विरोध करू. हडपसर येथील कचरा थांबवून महापौरांनी शहरात कुठेही कचरा प्रकल्प सुरू करावा, अशी मागणी नगरसेवक योगेश ससाणे यांनी केली. आतापर्यंत फक्त गाड्या अडवल्या आहेत. यापुढे या गाड्या जाळल्या जातील, असा असा इशाराही ससाणे यांनी दिला.