खेड/पुणे - ग्रामीण भागातील कोरोना साखळी ब्रेक करण्यासाठी हॉटस्पॉट गावांमध्ये अँटिजेन टेस्ट शिबिर राबविण्यात येत आहे. मात्र, सध्या या अँटिजेन किटचा तुटवडा असल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश हॉटस्पॉट गावातील तपासणीचे कॅम्प रद्द करावे लागत आहेत. अँटिजेन किट पुरवठादारांकडून पुरवठा थांबल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीवर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत पडसाद उमटले.
तुटवड्याची स्थिती लक्षात घेता जिल्हा परिषदेने अँटिजेन तातडीने खरेदी करण्याची मागणी बैठक झाली. जिल्ह्यामध्ये ग्रामीण क्षेत्रात दररोज आठ ते दहा हजार कोरोना टेस्ट केल्या जातात. सध्या हॉटस्पॉट गावांची संख्या वाढल्याने गावोगाव अँटिजेन टेस्टचे कॅम्प आयोजित केले जात आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून टेस्टसाठी किटचा तुटवडा भासू लागल्याने कॅम्पमध्ये तपासण्याची संख्यादेखील कमी झाली आहे.
आज अनेक गावांमधील कॅम्प किट अभावी रद्द करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सर्व सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. तेव्हा अध्यक्ष निर्मला पानसरे आणि आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून किटचा पुरवठा होत नसेल, तर जिल्हा परिषदेने तातडीने किट खरेदी करावीत, असे सांगितले.
दरम्यान, पुरवठादाराने परवडत नसल्याने किटच दर वाढवून देण्याची मागणी करत पुरवठा थांबवला आहे. त्यावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बिलोलीकर यांनी आणखी 10 हजार किट उपलब्ध करून देण्याचे मान्य केले. मात्र, किटचा पुरवठा आणि हॉटस्पॉट गावांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोना चाचण्या अधिक वेगाने कराव्या लागतील. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेने किट खरेदी करावीत, अशी मागणी शरद बुट्टेपाटील, आशा, बुचके, वीरधवल जगदाळे, दिलीप यादव यांच्यासह सर्व सदस्यांनी केली. किट खरेदी जिल्हा शल्यचिकित्सकांमार्फत होते, त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र पुरवठादाराकडून जादा दराची मागणी होत असल्याने अडचण आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आणि हॉटस्पॉट गावे लक्षात घेता कोरोना चाचण्या अधिक गतीने करावे लागतील. पॉझिटिव्हिटी रेट 30 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. कॅम्पसाठी अँटिजेन किट अपुऱ्या पडत आहेत. अशा वेळी गरज पडल्यास जिल्हा परिषदेमार्फत किट खरेदी केली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांनी दिली आहे.