पुणे - जिल्ह्यातील ग्रामीण भागात शहरांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. काही गावांमध्ये तर दररोज कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. उपाययोजना करून देखील रुग्ण संख्या कमी होत नसल्याने, अशी गावे 'हाय अलर्ट' आणि अलर्ट म्हणून घोषित करण्यात आली आहे.
जिल्ह्यामध्ये 159 गावे ही हाय अलर्ट आहेत, तर 107 गावांचा समावेश अलर्टमध्ये करण्यात आला आहे. तर 13 तालुक्यांमध्ये 3 हजार 841 ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. ग्रामीण भागात आतापर्यंत 2 लाख 30 हजार 358 कोरोनाबाधित आढळून आले असून, आतापर्यंत 3 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 'हॉट स्पॉट' ठरलेली गावे जिल्हा परिषदेसह जिल्हा प्रशासनाने कोरोनामुक्त करण्याचे उद्दिष्ठ ठेवले असून, त्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केले आहेत.
ग्रामीण भागात रुग्णांमध्ये वाढ
ग्रामीण भागात सर्वे केल्यानंतर ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रात रुग्ण वाढत असल्याचे आढळून आले आहेत. ज्या गावात सातत्याने रुग्ण संख्या वाढत आहे, ती गावे हाय अलर्ट म्हणून घोषित करण्यात यावीत, तसेच ज्या ठिकाणी रुग्ण संख्या कमी होत नाही ती गावे अलर्ट म्हणून घोषित करण्यात यावीत असा प्रस्थाव जिल्हा परिषदेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता.
जिल्ह्यातील हाय अलर्ट गावे
हवेली, खेड, जुन्नर, बारामती, इंदापूर, पुरंदर आणि शिरुर तालुक्यातील नगरपालिका, नगरपंचायत तसेच ग्रामपंयातीचा समावेश आहे. तर अलर्ट गावांमध्ये आंबेगाव, बारामती, इंदापूर, पुरंदर, शिरुर या तालुक्यांचा समावेश आहे. या ठिकाणी रुग्ण संख्या कमी करण्याबाबत प्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले असून, ग्रामीण भागात पूर्वी ज्या गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत होते आणि तेथील रुग्णसंख्या कमी होत नाही त्या गावांना 'अलर्ट गावे' म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच ज्या गावांमध्ये नव्याने रुग्ण वाढत आहेत, त्यां गावांचा समावेश 'हाय अलर्ट' मध्ये करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
हेही वाचा - क्रिकेटपटू पीयूष चावलाच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन, १० दिवसांपासून सुरु होते उपचार