बारामती (पुणे)- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीतील निवासस्थान असणाऱ्या गोविंद बागेतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. गोविंद बाग येथील चार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे. आज दुपारी चौघांचे कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आले आहेत. चार जणांमध्ये तीन पुरुष आणि एक महिलेचा समावेश आहे. शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान सिल्वर ओक येथेही कोरोनाने शिरकाव केला होता.
हेही वाचा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव, मोहरम साधेपणाने साजरे करावेत - गृहमंत्री अनिल देशमुख
शरद पवार यांचे गोविंदबाग हे निवासस्थान माळेगाव बुद्रूक गावच्या हद्दीत येते. माळेगावात यापूर्वीच कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे माळेगावातील काही भाग यापूर्वीच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेला आहे. गोविंदबागेचा परिसर प्रतिबंधित करण्याची तयारी प्रशासनाने सुरु केली आहे. त्यामुळे आणखी दोन आठवडे पवार यांना गोविंद बागेत येता येणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री, राज ठाकरेंचे कृष्णकुंज येथील व्यक्तींनाही यापूर्वी कोरोना संसर्ग झाला होता.