पुणे - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात देखील प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. हा प्रादुर्भाव वेळेवरच रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील हाॅटस्पाॅट असलेल्या 104 गावांतील शंभर टक्के म्हणजे तब्बल 4 लाख 82 हजार 687 लोकांची तपासणी करण्यात आली. यात सुमारे 10 हजार 207 लोकांना कोरोनाची लक्षणे दिसून आली. या लोकांची कोरोना चाचणी केल्यानंतर 25.63 टक्के म्हणजे 2 हजार 591 लोक कोरोना पॉझिटिव्ह आले.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात कोविड केअर सेंटरची संख्या वाढविणे, जास्तीत जास्त कोरोना पॉझिटिव्ह लोकांना त्वरीत उपचार उपलब्ध व्हावेत, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातून कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनच घेत आहे. याच सोबत कोरोना लसीकरणावरदेखील अधिक भर दिला आहे. जिल्ह्यातील कोरोना सुपर स्प्रेडर लोकांची आणि हाॅटस्पाॅट गावांतील शंभर टक्के लोकांची तपासणी करणे, असे विविध उपक्रम हाती घेतले आहेत.
गेल्या पंधरा दिवसांत जिल्हा प्रशासनाच्या वतीने अधिकारी व कर्मचारी यांची मोठी टीम लावून घरोघरी जाऊन लोकांची तपासणी केली. यात 104 हाॅटस्पाॅट गावात ही तपासणी केली आणि पावणे पाच लाख लोकांमध्ये केवळ 2 हजार 591 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. या पाॅझिटिव्ह आलेल्या लोकांना तातडीने त्या-त्या तालुक्यातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले. यात 1 हजार 911 लोकांनी कोविड केअर सेंटरमध्ये जाण्याचा, तर 631 लोकांनी आपल्याच घरी होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यातील हाॅटस्पाॅट गावांची तालुकानिहाय माहिती :-
तालुका - तपासणी केलेले लोक - संशयित पॉझिटिव्ह -
- आंबेगाव - 51109 2405 958
- बारामती - 22207 685 139
- भोर - 16125 621 66
- दौंड - 29998 277 76
- हवेली - 50515 166 116
- इंदापूर - 16958 294 64
- जुन्नर - 57567 1087 338
- खेड - 48455 217 52
- मावळ - 43985 1589 200
- मुळशी - 65037 1248 162
- पुरंदर - 22380 432 64
- शिरूर - 57863 982 316
- वेल्हा - 488 212 40
- एकूण - 482687 10207 2591