पुणे- भाजप सरकार अनुसूचीत जाती-जमाती, ओबीसी यांच्या आरक्षणाच्या विरोधात आहे, असा आरोप करत पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, अभय छाजेड, अरविंद सावंत, कमळ व्यवहारे यांसह कांग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. आरक्षण रद्द करू पाहणाऱ्या मोदी सरकारचा निषेध, संविधान बचाओ देश बचाओ, आरक्षण बचाओ देश बचाओ, भाजप सरकार हाय हाय, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी भाजप सरकारचा निषेध केला.
हेही वाचा- ठाकरे सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून
देशातील अनुसूचीत जाती-जमाती, ओबीसींना संरक्षण मिळाले पाहिजे, ही कॉंग्रेसची भूमिका आहे. परंतु, देशात ज्या-ज्या ठिकाणी भाजपचे राज्य आहे. त्याठिकाणी त्यांनी आरक्षण रद्द करण्याचा घाट घातला आहे. सध्या उत्तराखंड राज्यातील आरक्षण संपविण्याच्या प्रयत्नात भाजप नेते आहेत. या एका राज्यात हा प्रयोग यशस्वी झाला तर देशातील इतर राज्यातही हा प्रयोग राबविण्याच्या प्रयत्नात ते आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी यावरुन भाजपला जाहीर आव्हान दिले आहे.
कॉंग्रेसला कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल पण गोरगरिबांसाठी असलेले आरक्षण रद्द होऊ देणार नाही असा निर्धार काँग्रेसने केला आहे. भाजपच्या या आरक्षणविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठीच पुणे कॉंग्रेसच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले, अशी माहिती पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी दिली. केंद्र सरकारने आपला हा निर्णय बदलला नाही तर संपूर्ण देशभरात काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलने करण्यात येतील अशा इशाराही त्यांनी यावेळी दिला.