पुणे - विवाह समारंभात अवाढव्य खर्च केला जातो. एवढेच नाही तर अनेक जण नेते मंडळींना आमंत्रित करून दिखावा करतात. विवाहात नगरसेवकापासून ते मंत्र्यांपर्यंत थाटात त्यांचा सत्कार केला जातो. मात्र, येथील एका विवाहसोहळ्यात देशसेवेसाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या जवानांचा सत्कार करून अनोखा संदेश देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये धनेश्वर भोस या निवृत्त जवानाने कारगिल युद्ध आणि पाकिस्तानच्या कुरापतीमध्ये जखमी झालेल्या (दिव्यांग) जवानांना आमंत्रित करून त्यांचा सत्कार केला. त्यामुळे या विवाह सोहळ्याला देशभक्तीचा रंग चढला होता.
सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास प्रियांका आणि वैभवचा विवाह होता. विवाहामध्ये 10 निवृत्त जखमी जवानांना विशेष निमंत्रण देण्यात आले होते. निवृत्त जवान धनेश्वर हे एका पायाने दिव्यांग आहेत. कारगील युद्धात शत्रूशी दोन हात करताना भू-सुरुंग स्फोट होऊन ते गंभीर जखमी झाले. यात त्यांचा उजवा पाय निकामी झाला होता. माजी सैनिक असल्याने त्यांनी पुढारी आणि नेत्यांना न बोलावता युद्धात आणि पाकिस्तानने केलेल्या कुरापतीमध्ये जखमी झालेल्या जवानांना आपल्या मुलीच्या विवाह सोहळ्यात बोलवून त्यांचा सन्मान केला आहे. यावेळी उपस्थित नातेवाईकांच्या गालावर तिरंगी झेंड्यांचा रंगीत पट्टाही लावण्यात आला. त्यामुळे या विवाह सोहळ्याला देशभक्तीचा रंग पहायला मिळाला.
हेही वाचा - पुण्यातील कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे आंदोलन; मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप
विशेष म्हणजे विवाह सोहळ्यात मंगलाष्टक न म्हणता राष्ट्रगीत लावण्यात आले होते. लग्नातील इतर खर्च टाळून जवानांना मदत करावी. आपला इतर खर्च होतच राहतो. मात्र, अशा कार्यक्रमातून जवानांना प्रोत्साहन मिळेल, अशी प्रतिक्रिया नवरदेव वैभव यांनी दिली. आमचे बालपण वडिलांनी पाहिलेले नाही. १५ ते २० वर्षे माझे बाबा माझ्यापासून देशसेवेसाठी दूर होते. असा वेगळा उपक्रम प्रत्येकाने करावा आणि प्रत्येक जवानांचा सन्मान केलाच पाहिजे, अशी प्रतिक्रिया वधू प्रियंका यांनी दिली.
दरम्यान, कारगिल युद्धादरम्यान अत्यंत महत्त्वाचे प्रशिक्षण आम्हाला दिले जात होते. आम्हाला पाकिस्तानात जावे लागणार होते. अशा परिस्थितीत मणक्याला जखम झाली होती, असे निवृत्त जवान शंकर लाखे यांनी सांगितले. आज या सत्काराने मन भरून आले आहे, असा आमचा सत्कार कधी झाला नव्हता, अशा प्रकारे जवानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
हेही वाचा - राजर्षी शाहूंच्या समाधी स्मारक लोकार्पण सोहळ्याला जनक घराण्यालाच निमंत्रण नाही ! पाहा काय म्हणाले समरजितराजे
यावेळी रामदास पांडुरंग मोरे, शंकर श्रीराम लाखे, गोविंद बिरादार, सुरवसे व्ही.यम, सुर्वे विष्णू मोतीराम, जितेंद्र सिंग, अमित यादव, पांडुरंग आनंदराव यादव, बसवराज पट्टनशेड्डी, कलप्पा माने, साईनाथ पौळ, कर्नल भार्गव हे उपस्थित होते.