बारामती (पुणे) - इंदापूर तालुक्यातील झगडेवाडी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून संरक्षण भिंत बांधण्यात येत आहे. जिल्हाधिकार्यांनी या संरक्षण भिंतीच्या कामाची पाहणी केली.
मनरेगा योजनेतून निधी मंजूर
झगडेवाडी ग्रामपंचायतीने अभिसरण योजनेतून जिल्ह्यात प्रथमच काम सुरू केले आहे. या योजनेसाठी मनरेगातून चार लाख 66 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यात ग्रामपंचायतीने एक लाखांचा स्वहिस्सा भरला आहे. शनिवारी जिल्हाधिकारी राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी इंदापूर तालुक्यातील झगडेवाडी गावात भेट दिली. त्यांनी मनरेगा योजनेतून सुरू असलेल्या कामाला भेट देऊन कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
अभिसरण योजनेचा लाभ
ग्रामीण भागातील विकास कामांसाठी निधीची कमतरता जाणवत होती. त्यामुळे केंद्र शासनाने काही महिन्यांपूर्वी शाळा, आरोग्य केंद्र व स्मशानभूमी परिसराचे सुशोभीकरण आदीसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील निधी देण्याची योजना जाहीर केली. मात्र हा निधी देताना स्वहिस्सा म्हणून ग्रामपंचायतीने वित्त आयोगातून काही निधी खर्च करण्याची अट आहे. या योजनेला अभिसरण योजना असे नाव देण्यात आले आहे. याप्रसंगी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सोनाली मेटकरी, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, विस्तार अधिकारी सचिन धापटे उपस्थित होते.
हेही वाचा - चंद्रकांत पाटलांचे रश्मी ठाकरेंना पत्र, म्हणाले...