बारामती- बारामती तालुक्यात मौजे सायबांचीवाडी येथे शिवारफेरी अंतर्गत श्रमदानातून उभारलेल्या बांधाची तसेच मुरघास प्रकल्प व तलाव सुशोभीकरण आणि पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांची पाहणी आज जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विश्वास देवकाते, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, पाणी फाऊंडेशनचे राज्य मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ, उपसरपंच प्रमोद जगताप आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
समृद्ध गाव योजनेमध्येही भाग घेण्याचे आवाहन
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी शिवारफेरी अंतर्गत केलेल्या, तसेच पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सायंबाचीवाडी येथील ग्रामस्थांनी पाणी फाऊंडेशन या संस्थेची मदत घेऊन, खरोखरच उल्लेखनीय कामे केली आहेत. सध्या वॉटर बजेट प्लसमध्ये असले तरी त्याचे योग्य जल व्यवस्थापन करून त्यात सातत्य राखणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढेल व गाव समृध्द होईल. तसेच सायंबाचीवाडी येथील ग्रामस्थांनी एकत्रितपणे चांगले काम केले आहे. गावातील ग्रामस्थांच्या ज्या काही अडचणी असतील त्या प्रशासनाकडून सोडवण्यात येतील, सर्व ग्रामस्थांचे मी अभिनंदन करतो. गावाने आता समृद्ध गाव योजनेत सहभाग घ्यावा, त्यांना प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
पाणीसाठ्यात वाढ
यावेळी पाणी फांऊडेशनचे प्रतिनिधी म्हणाले की, सन 2018-19 मध्ये गावात उपलब्ध पाणीसाठा 106.77 कोटी लिटर होता, आणि प्रत्यक्षात 269.92 कोटी लिटर पाण्याची गरज होती. ज्यावेळी गावाने 2019-20 मध्ये सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये भाग घेतला, यावेळी मशीन आणि श्रमदानातून झालेल्या कामातून गावाने तब्बल 11 कोटी 40 लाख लिटर पाण्याची साठवणूक केली आहे. हा पाणी साठा गावाच्या गरजेपेक्षा कीतीतरी पटीने अधिक आहेत. यातून गावाच्या पाण्याबाबतच्या सर्व गरजा भागणार आहेत.