बारामती (पुणे) - तालुक्यातील जैनकवाडी येथील वनपरिक्षेत्रात चिंकारा जातीच्या हरणाची शिकार झाल्याचे समोर आले आहे. या हरणाची शिकार पार्टी करण्याच्या हेतूने झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, काही जागरुक नागरिकांनी वेळीच लक्ष दिल्याने आरोपींचा पार्टीचा बेत फसला. याप्रकरणी वनविभागाला माहिती मिळताच संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जैनकवाडी येथील पवार वस्तीच्या परिसरात शेतकरी काम करीत असताना त्यांना एक शिकारी कुत्रा जखमी हरणाचा पाठलाग करताना दिसला. त्याच वेळी कुत्र्यामागून एक व्यक्ती पळताना दिसली. यावेळी कुत्र्याने हरणावर हल्ला केला. यात हरणाचा मृत्यू झाला. हा प्रकार पाहिलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित व्यक्तीला जाब विचारला असता, त्या व्यक्तीने शेतकऱ्यांना अरेरावीची भाषा केली. यावेळी परिसरातील व्यक्ती जमू लागल्याने ती व्यक्ती पळून गेली.
घटनेची माहिती वन विभागाला मिळाल्यावर उपवनसंरक्षक लक्ष्मी, सहायक वनरक्षक वैभव भालेराव, प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, वनपाल टी. जे. जराड, वनरक्षक कवितके, वनमजूर काळंगे यांनी घटनास्थळाला भेट दिली. यानंतर पंचनामा करून वन पशु हत्याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. तर पुढील तपास सुरू आहे.