पुणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटला भेट देत आग लागलेल्या इमारतीची पाहणी केली. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री सीरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले होते. सीरमला लागलेल्या आगीत कोरोना लसीचे कोणतेही नुकसान झाले नसून ही आग घात की अपघात हे चौकशीनंतर कळेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
आगीचा लसीकरणावर कोणताही परिणाम होणार नाही -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटला भेट देत आग लागलेल्या इमारतीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सीरममध्ये आग लागल्याच्या बातमीने काळजाचा ठोका चुकला होता. दुर्दैवाने 5 जणांचा मृत्यू झाला. परंतु ज्या ठिकाणी कोविशिल्ड लसीचे उत्पादन सुरू आहे, तिथे कोणतेही नुकसान झाले नसल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. तसेच सीरमला लागलेल्या आगीचा लसीकरणावर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही ते म्हणाले.
घात की अपघात हे चौकशीनंतर कळेल -
सीरमला लागलेली आगीसंदर्भात अनेकांनी हा घात असल्याची शक्यता असल्याची शक्यता वर्तवली होती. यावर प्रतिक्रिया देताना सीरमला लागलेली आग घात की अपघात हे चौकशीनंतर कळेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
पाच कामगारांचा झाला होता मृत्यू -
कोरोनावरील लसीचे उत्पादन करत असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये गुरुवारी दुपारी भीषण आग लागली होती. सीरम इन्स्टिट्यूटच्या युनिट 1 मधील इमारतीचे काम सुरू असताना यात आग लागली आणि दोन मजले जळून खाक झाले होते. या आगीत 5 कामगारांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी आज घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार गिरीश बापट, आमदार चेतन तुपे, सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला तसेच पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता उपस्थित होते.
हेही वाचा - जादा व्याज आकारणाऱ्या एनबीएफसीवर कारवाई करा; राज ठाकरेंची आरबीआयकडे मागणी