पुणे - महाराष्ट्राला वारीची ७०० वर्षांची परंपरा आहे. गेल्या वर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वारकरी संप्रदायाने वारीबद्दल लवचिकता दाखवत पायी वारी रद्द केली. यावर्षी पंढरीमध्ये जे वारकरी दाखल झाले आहेत, जे होत आहेत, त्यांना येऊ द्यावे आणि दर्शनाची परवानगी द्यावी. शासन वारकऱ्यांना अटक करत असेल आणि पंढरीमध्ये येऊ देत नसेल, तर ते नैतिकदृष्टया योग्य नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सर्व वारकऱ्यांना एकत्र घेऊन महापूजा करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. यासंदर्भातील निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
किमान ११ वारकऱ्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेऊ द्यावे -
देशात सर्वत्र जनजीवन सामान्य होत असताना, हॉटेल्स, मॉल, दारूची दुकाने, बाजारपेठा लग्न समारंभ, सरकारी जाहीर कार्यक्रम सुरु आहेत. मात्र, शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या पालखी सोहळ्यावर बंधने घालण्यात आली. यावर्षी कोरोनाचे संकट थोडेसे आटोक्यात आले आहे. कोरोनाचे नियम पाळून जे वारकरी पंढरपूरच्या वाटेवर चालले आहेत आणि ज्या मानाच्या दिंडया आहेत, त्यातील किमान ११ वारकऱ्यांना जाऊ द्यावे आणि विठ्ठलाचे दर्शन घेऊ द्यावे, अशी मागणी तुषार कुलकर्णी यांनी केली आहे.
'सरकारचा वारकऱ्यांवर जाणीवपूर्वक सुलतानी अत्याचार' -
सरकारचा वारी विरोध म्हणजे सरकारने आस्मानी संकटांचा फायदा घेत पोलीस प्रशासनाच्या बळाने वारकऱ्यांवर जाणीवपूर्वक केलेले सुलतानी अत्याचार आहेत. महाराष्ट्राचे जेष्ठ कीर्तनकार हभप बंडातात्या कराडकर यांना केलेली अटक, त्यानंतर फसवून केलेली त्यांची नजर कैद हा त्याचाच एक प्रकार आहे. भर रस्त्यात वारकऱ्यांचे पारंपारिक गणवेश उतरवायला लावून, हिंदुत्त्वाचे व महाराष्ट्राच्या संकृतीचे प्रतिक असलेल्या भागवत धर्मीय पताकाची अवहेलना करणाऱ्या निरपराध संतांना अटक करून त्यांना अपराधाची वागणूक देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांची तत्काळ माफी मागितली पाहिजे. जागोजागी अडवणूक केलेल्या सर्व वारकऱ्यांना सन्मानपूर्वक तत्काळ मुक्त करावे व त्यांच्यावर लावलेले सर्व गुन्हे तत्काळ मागे घ्यावे, अशी मागणीही परिषदेतर्फे करण्यात आली.
हेही वाचा - इम्रान खान वर विश्वास ठेऊ नये- संजय राऊत