पुणे (पिंपरी-चिंचवड) - अमली पदार्थ विरोधी पथकाकडून चाकण परिसरातून 20 कोटींचे मेफेड्रॉन ड्रग्स आणि पाच आरोपींना पकडण्यात आले होते. त्याची पायमुळं हे थेट मुंबईमधली असून छोटा राजन टोळीचा सदस्य हाच मुख्य सूत्रधार असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. तो इतर साथीदारांच्या मदतीने रांजणगाव येथील बंद पडलेल्या केमिकल कंपनीत मोठ्या प्रमाणावर ड्रग्स बनवत असल्याचे समोर आले असून, संबंधीत कंपनीला सील ठोकण्यात आले असल्याचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत दुःखदायक, पण मी भाजप सोडणार नाही- रक्षा खडसे
या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने मुख्य सूत्रधार राजन टोळीचा सदस्यासह नऊ जणांना अटक केली आहे. त्यात एका नायझेरियन आरोपीचा समावेश आहे. त्यांच्याकडून 85 लाख रोख रक्कम आणि 75 लाखांचे जमिनीचे कागद पत्रे पोलिसांनी जप्त केले आहेत. आतापर्यंत या प्रकरणी 14 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी तुषार सुर्यंकात काळे (वय 42 रा बोरीवली पश्चिम मुंबई), राकेश श्रीकांत खानीवडेकर (वय 32, रा नवी मुंबई) हे दोघे मुख्य आरोपी असून, किरण मच्छिंद्र काळे (वय 32 रा. शिरुर पुणे), अशोक बाळासाहेब संकपाळ (वय 37 रा आंबळे, ता शिरुर जि पुणे), किरण दिनकर राजगुरु (वय 32 रा नालासोपारा वेस्ट, मुंबई), कुलदीप सुरेश इंदलकर (वय 36 रा बोरीवली पश्चिम, मुंबई), जुबेर रशीद मुल्ला (वय 39 रा मुंब्रा जि ठाणे), ऋषिकेश राजेश मिश्रा (वय 25 रा. भाडुप वेस्ट मुंबई मुळ रा उत्तरप्रदेश), जुबी उडोको (नायझेरियन) (वय 41 सध्या रा नायगाव इस्ट, मुंबई) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने चाकण परिसरातून 20 कोटींचे ड्रग्स आणि पाच आरोपींना अटक केली होती. याचे थेट कनेक्शन मुंबईमधील असून, छोटा राजन टोळीचा सदस्य तुषार काळे हा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. सराईत गुन्हेगार तुषार याच्यावर खून, दरोडा खंडणी असे गंभीर गुन्हे दाखल असून, त्याने तुरुंगात असलेल्या एका गुन्हेगाराकडून ड्रग्स कसे बनवायचे याची माहिती घेतली होती. त्यानुसार छोटा राजन टोळीचा सदस्य तुषार याने व्यक्तींची जुळवाजुळव सुरू केली होती.
हेही वाचा - बाबाच्या चाहत्यांना खुशखबर.. संजय दत्तने कॅन्सरवर केली मात, फॅन्सना म्हणाला..
रांजणगाव येथे सुयोग बायोटेक लिमिटेड या बंद कंपनीत 132 किलो मेफेड्रोन ड्रग्स बनवले होते. त्या पैकी 112 किलो ड्रग्स हे नायझेरियन आरोपी जुबी उडोको याला तुषार काळे याने पूर्वीच विकले आहे. उर्वरित 20 किलो ड्रग्स अक्षय काळे याने आपल्या घरी ठेवले होते. ते विक्री करायला जात असताना अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडून आरोपीला अटक केली होती.
दरम्यान, नायझेरियन व्यक्ती येवढ्या मोठ्या प्रमाणावर घेतलेले ड्रग्स कोणाला विकत होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. तर, मुख्य सूत्रधार तुषार काळे आणि दुसऱ्या मुख्य साथीदार राकेश श्रीकांत खाणीवडेकर यांच्याकडून 85 लाख रोख रक्कम जप्त केली आहे.
मुख्य सुत्रधाराच्या शोधासाठी बनवली 6 तपास पथके
या गुन्ह्याचा प्रमुख सूत्रधार असलेला तुषार सूर्यकांत काळे व राकेश श्रीकांत खानिवडेकर उर्फ रॉकी यांच्या शोधासाठी 6 तपास पथकांनी कांदिवली, मुंबई, वसई, पालघर, नाशिक, नवी मुंबई व कर्जत या भागात तसेच मुंबई येथील सहारा विमानतळ याठिकाणी सतत सात दिवस-रात्र मेहनत करून आरोपींचा शोध घेतला व त्यांना ताब्यात घेतले. तसेच झुबी इफनेयी उडोको नावाचा नायझेरियन नागरिक याला ताब्यात घेतले. तो यापूर्वी अमली पदार्थांच्या केसमध्ये कोल्हापूर जेलमध्ये दहा वर्ष शिक्षा भोगलेला आरोपी आहे. त्याचा विजा पाहिला असता त्याने यामध्ये छेडछाड केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले असून, त्याबाबत स्वतंत्र कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
या पोलीस पथकाने बजावली महत्वाची भूमिका
ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ, गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, अंबरीश देशमुख, प्रशांत महाले, पोलीस सब इन्स्पेक्टर चामले यांच्यासह इतर पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे.