पुणे - मराठा समाजाच्या उन्नतीसाठी सुरू करण्यात आलेल्या सारथी संस्थेच्या बचावासाठी खासदार संभाजीराजे यांनी आज (शनिवार) पुण्यातील सारथी संस्थेबाहेर लाक्षणिक उपोषण केले. छत्रपतींच्या घराण्यातील व्यक्ती पहिल्यांदाच अशाप्रकारे उपोषणाला बसली आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सारथी संस्थेची स्वायत्तता अबाधित राखली जाईल, असा शब्द दिल्याने संभाजीराजेंनी हे आंदोलन मागे घेतले आहे. यावेळी उपोषणाच्या ठिकाणी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून संभाजीराजेंशी चर्चा करुन सरकारच्या निर्णयाची माहिती दिली.
मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेला बंद करण्याचा घाट घातला जात आहे. तसेच या संस्थेची स्वायत्तता रद्द करण्याचे षडयंत्र सुरूअसल्याचा आरोप मराठा समाज संघटनांनी केला होता. म्हणून याविरोधात मराठा संघटनांकडून सारथी संस्थेबाहेर 1 दिवसाचे लाक्षणिक उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले होते. या उपोषणात खासदार छत्रपती संभाजीराजे, ज्येष्ठ कृषी तज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, सारथी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत सहभागी झाले होते.
उपोषणाच्या ठिकाणी मंत्री एकनाथ शिंदे यांनी हजर राहून संभाजीराजेंशी चर्चा केली. तसेच उद्धव ठाकरेंनी सारथी स्वायत्तता कायम राहणार असल्याचे आश्वासन दिल्याने संभाजीराजेंनी उपोषण मागे घेतले आहे.
सरकारच्या वतीने संभाजीराजे यांच्या मार्फत मराठा समाजाने केलेल्या सारथी संस्थेसंबंधीच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. सारथी संस्थेची स्वायत्तता अबाधित राखली जाईल, प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांना सारथीच्या पदावरून हटवले जाईल. तसेच गुप्ता यांनी जारी केलेले सर्व निर्णय रद्द केले जातील, संस्थेचे संचालक परिहार यांचा राजीनामा फेटाळला जाईल. तसेच सारथी बाबतच्या सर्व आक्षेपांविषयी त्रयस्थ यंत्रणेमार्फत उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. सोबतच सरकार मराठा आरक्षणासाठी संपूर्ण ताकदीने न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे शिंदेंनी सांगितले. मराठा आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत चर्चा झाल्याचेही सरकारच्या वतीने एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
सरकारने घेतलेल्या या निर्णयांची एकनाथजी शिंदेंनी दिली माहिती
१) सारथीची स्वायत्तता अबाधित राखली जाईल, हा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा शब्द
२) ओबीसी विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांना पदावरून हटवणार
३) गुप्ता यांनी जारी केलेले सर्व निर्णय रद्द
४) संस्थेचे संचालक श्री. परिहार यांचा राजीनामा फेटाळला
५) सर्व आक्षेपांविषयी त्रयस्थ यंत्रणेमार्फत उच्चस्तरीय चौकशी
६) मराठा आरक्षणासाठी संपूर्ण ताकदीने न्यायालयीन लढाई लढणार
याप्रसंगी छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण लढ्यात एकनाथ शिंदे यांनी बजावलेल्या भूमिकेबद्दल त्यांचे कौतुकही केले.