पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांनी बंड केल्यानंतर अनेक आमदारांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केले. त्यामध्ये शरद पवार यांचे विश्वासू मानले जाणारे छगन भुजबळ यांनी देखील बंड पुकारत मंत्री पदाची शपथ घेतली. जेव्हा मंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा पवार यांनी सांगितले होते की, छगन भुजबळ यांनी मला सांगितले होते की, मी परिस्थिती बघून तुम्हाला फोन करतो. मात्र तेव्हा असे न होता भुजबळ यांनी थेट शपथविधी घेतला. यावर आता भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
फुले दाम्पत्याचे दर्शन घेतले : छगन भुजबळ म्हणाले की, हो मी तसे सांगितले होते. पण शरद पवार हे भाजपबरोबर बोलणी करतात, अध्यक्षपद सोडायचा निर्णय घेतात. तो निर्णय मागे घेतात. तेव्हा ते काहीच आम्हाला सांगत नाहीत. तर मग मी का बोलावे असे भुजबळ यांनी सांगितले. मंत्री छगन भुजबळ यांनी आज पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे भेट दिली. फुले दाम्पत्याचे दर्शन घेतले यावेळी ते बोलत होते. यावेळी भुजबळ म्हणाले की, मला शरद पवार यांचा फोन आला मी म्हटल की, जाऊन बघतो. पण याचा अर्थ मला काही माहीत नव्हतं असे नाही. ते जे काही निर्णय घेतात ते सांगत नाही तर, मग मी कशाला सांगणार. सगळेच आमदार होते मी बाहेर राहून काय करणार, परत लढतच राहणार का? असे देखील यावेळी भुजबळ म्हणाले.
समतेचा विचार सोडलेल नाही : यावेळी भुजबळ यांना समता विचार धारेवरून विचारले असता, भुजबळ म्हणाले की, आम्ही समतेचा विचार सोडलेला नाही आणि सोडणारही नाही. आम्ही फुले, शाहू, आंबेडकर यांचा रस्ता सोडलेला नाही. ज्या ज्या पक्षात जबाबदारी दिली ती ती जबाबदारी पार पाडली. 2014 ला मी मोदी यांच्या विरोधात भांडलो. पण तेव्हा शरद पवार यांच्याशी भाजपने बोलणी केली. तेव्हा राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडले आणि भाजपने शिवसेनेला सोडले.अशी अनेक प्रकरणे घडली. 2019 अजित पवार यांच्या समोर ठरले होत की, भाजप बरोबर जायचे आहे. पण असे न करता शिवसेनेबरोबर जाऊन सरकार स्थापन केले. याचाच राग मनात ठेवून अजित पवार यांनी पहाटेची शपथ घेतली.
सुप्रिया सुळेंना विरोधच नव्हता : आता देखील 54 आमदारांच्या सह्या आहेत आणि यात रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्या देखील सह्या आहे. जेव्हा शरद पवार यांनी राजीनामा दिला होता. तेव्हा एक प्रस्ताव केला होता की, सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करावे पण तेव्हा जितेंद्र आव्हाड हे प्रफुल्ल पटेल यांच्या अंगावर गेले. आमचा सुप्रिया सुळेंना विरोधच नव्हता, असे देखील यावेळी भुजबळ म्हणाले.
म्हणून भाजप सोबत गेलो : यावेळी पत्रकारांकडून झालेल्या प्रश्नांच्या भडीमारावर भुजबळ म्हणाले की, मी सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तर देणार, मी पळून जाणार नाही, शरद पवार यांनी नेहमी डळमळीत निर्णय घेतले. निर्णय बदलले, भाजपसोबत जाण्याचा शब्द देऊन तो फिरवला. या सगळ्याचा परिणाम म्हणून आम्ही अजित पवारांच्या नेतृत्वाखाली भाजप सोबत गेलो. 2014 पासून भाजपचे सरकार आहे. तेव्हापासून मी मोदी यांच्या विरोधात भांडलो. 2017 ला मी जेलमध्ये होतो. 2014 ला पवार यांना, जयंत पाटील, अजित पवार हे तातडीने डील झाले तुम्ही काँग्रेस सोडा, आम्ही शिवसेना सोडतो. राष्ट्रवादी नेत्यांनी सांगितले भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार करू असे सांगण्यात आले.
लढाई होईल ती आम्ही मान्य करू : पवार यांनी पाठिंबा दिला, बरोबर सरकारमध्ये जाणार असे ठरले होते. पण अचानक शिवसेने बरोबर माहविकास आघाडी स्थापन करण्यात आली. त्यामुळे अजित पवार यांनी पहाटेचा शपथ विधी केला. लढायचे तर लढले पाहिजे पण सतत तळ्यात मळ्यात निर्णय होतात ते योग्य नाही. असे देखील यावेळी भुजबळ म्हणाले. विधानसभा अध्यक्षांना जयंत पाटील यांनी दिलेल्या पत्राबाबत जी काही कायदेशीर लढाई होईल ती आम्ही मान्य करू असे, भुजबळ म्हणाले.
जबाबदारी पार पाडली आहे : शिंदे फडणवीस कामगिरीबाबत भुजबळ म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांनी आमच्या मागणीचा विचार केला. बाठीया आयोग देवेंद्र फडणवीस यांनी केला आणि आमचे आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्न केले. मंडल आयोगाबाबत शरद पवार यांचे उपकार आहेत, मी ज्या ज्या पक्षात होतो तिथे मी ती ती जबाबदारी पार पाडली आहे. असे देखील यावेळी भुजबळ म्हणाले.
हेही वाचा -