पुणे - बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपची विजयाची गुढी उभी करण्यासाठी इंदापूर आणि भोरमध्ये अनेक अदृश्य शक्ती काम करत आहेत, असे सूचक वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात चर्चांना उधाण आले आहे.
भाजपकडून बारामती लोकसभा मतदारसंघातून कांचन कुल या निवडणूक लढवत आहेत. पाटील हे कुल यांच्या प्रचारासाठी रविवारी पुण्यातील वडगाव परिसरात सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते. पाटील पुढे म्हणाले की, बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणावर काम करण्याची गरज आहे. यासाठी खडकवासला, पुरंदर आणि दौंड तालुक्यांमध्ये भाजपला समर्थन मिळत आहे. इंदापूर आणि भोरमध्येही अनेक अदृश्य शक्ती काम करत आहेत. त्याप्रमाणेच बारामतीमध्ये आपल्याला काम करण्याची गरज असून, मी स्वतः शेवटचे तीन दिवस बारामती तळ ठोकणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.