पुणे Chandrashekhar Bawankule : विरोधकांकडं मुद्दे नसल्यानं ते अशी बॅनरबाजी करताय. विरोधकांनी दुष्काळ, मराठा आरक्षण, बेरोजगारी या प्रश्नावर अधिवेशनात आपली भूमिका मांडून लोकांच्या हिताचे प्रश्न मांडावेत. त्यांच्यासाठी ते हक्काचं व्यासपीठ आहे, अशी प्रतिक्रिया आज (7 डिसेंबर) पुण्यात बोलत असताना भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
मराठा आरक्षणावरही दिली प्रतिक्रिया : राज्यात मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन शब्द दिलाय. मराठा आरक्षण देण्यात यावं ही सरकारची भूमिका आहे. परंतु, मनोज जरांगे पाटील यांनी सर्व मराठा नेत्यांना एकत्र घेऊन मराठा समाजाच्या हिताचं काय आहे, याचा विचार करून चर्चा करावी. कोणीही दोन समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरीही आमची भूमिका हीच, असं बावनकुळे म्हणाले.
- आमच्याकडून धोका होणार नाही : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाचे भविष्य काय यावर बोलताना ते म्हणाले की, मी तुम्हाला बिहारचे उदाहरण देतो. त्यामध्ये आम्ही सार्वजनिक शब्द पाळलाय. राज्यातसुद्धा तिन्ही पक्षाचे नेते बसतील. लोकसभा आणि विधानसभेत सुद्धा आमची युती होईल. आमच्याकडून कुठल्याही प्रकारचा धोका मित्र पक्षांना होणार नाही.
विचारधारा सोडून पक्ष मोठा होत नाही : बाळासाहेब ठाकरे एका विचाराची लढाई लढत होते. विचारधारा सोडून दिल्यानं कधीच पक्ष मोठा होत नाही. बाळासाहेब ठाकरेंनी कधीही अविचारी युती केली नाही. मी देखील 25 वर्षे युतीत काम केलंय, असंही ते म्हणाले.
...ही भारतीय जनता पार्टीची संस्कृती नाही : ओबीसी मागासवर्ग आयोगावर सरकारचा दबाव असल्याचं मंत्री अतुल सावे म्हणालेत. त्यावर बोलताना, सरकार आणि ओबीसी आयोगामध्ये काय संवाद झालाय हे मला माहित नाही. कुठल्याही समाजाचा मुद्दा काढून बोलणं ही भारतीय जनता पार्टीची संस्कृती नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
हेही वाचा -