पुणे - 'सीपी साहेब हरकत नाही, तुम्ही काळजी करु नका, या सगळ्यांचा हिशोब लावला जाईल' अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना धमकी वजा इशारा दिला आहे. सोमय्या यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला तरी पोलिसांनी त्या शिवसैनिकांवर सौम्य कलम लावली, असे सांगत चंद्रकांत पाटलांनी इशारा दिल्यानंतर पोलीस आयुक्त अडचणीत येणार असल्याचे बोलले जात आहे.
महापालिका आवारात किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे किरीट सोमय्या आल्यानंतर त्यांना जी धक्काबुक्की झाली त्याविरोधात स्वतः किरीट सोमय्या यांनी शिवाजी नगर ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनीही पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांची बदली करा, अशी मागणी केली आहे.