पुणे - आंध्र प्रदेश, तामिळनाडूच्या किनारपट्टी परिसरात सध्या हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे शहरासह दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील बहुतांश जिल्ह्यांत दि. 12 ते 14 नोव्हेंबरदरम्यान पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
या जिल्ह्यांना येलो अलर्ट -
या स्थितीमुळे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि बीड, रायगड, रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग जिल्ह्यांत मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने शनिवार (13 नोव्हेंबर) आणि रविवार (14 नोव्हेंबर) या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.
शनिवार ,रविवार या भागात मुसळधार -
शनिवार, रविवार राज्यातील कोकण, घाट परिसर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
थंडी वाढली
पुण्यात रात्री तापमानात घट आणि दिवसा काही प्रमाणात उकाड्याची जाणीव होत आहे. तापमानात होणाऱ्या चढ-उतारामुळे संमिश्र वातावरणाची अनुभूती पुणेकर घेत आहेत.