पुणे - राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भात पुढील तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाट होण्याची शक्यता असून 18 आणि 19 मार्चला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातदेखील 17 मार्चला हवामान कोरडे राहील. मात्र, 18 मार्चरोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून 19 मार्चलादेखील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विदर्भामध्ये मात्र 17 मार्चला तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच 19 मार्चला तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाढण्याची शक्यता असून 19 मार्चलादेखील तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
विदर्भात पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी पाऊस -
एकंदरीतच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या चोवीस तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. दरम्यान केरळ ते मध्य महाराष्ट्रापर्यंत असलेला उत्तर दक्षिण कमी दाबाचा पट्टा देखील आता विरून गेला असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. कोकण गोव्याच्या बऱ्याच भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. कोकण गोवा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.