पुणे : शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 13 जुलैपासून दुसऱ्यांदा लॉकडाऊन घोषित केला आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या पाच दिवसात सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. तर, उरलेल्या पाच दिवसात सकाळी आठ ते बारा या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु ही वेळ व्यापाऱ्यांसाठी सोयीची नसल्याचे सांगत वेळेत बदल करून देण्याची मागणी पुणे व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष पोपटलाल ओसवाल यांनी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. त्यानुसार दुकान आणि इतर आवश्यक सेवेतील दुकाने, आस्थापना केंद्र सुरू ठेवण्याची वेळ ठरवून देण्यात आली आहे. मात्र, ही वेळ सोयीची नसल्याचे व्यापारी महासंघाने म्हटले आहे. भुसार मालाचा व्यापार हा सकाळी दहा ते चार या वेळेत चालतो. आठ ते बारा या वेळेत व्यापार करणे शक्य नाही. कारण हमाल सकाळी दहानंतर कामावर येतात. त्यामुळे, दोन तासात गाड्या खाली कशा करणार, सामान कसे देणार हा प्रश्न यावेळी निर्माण होतो.
त्यामुळे कामातील सोयीनुसार बाजारातील व्यवहार सकाळी दहानंतर सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच लॉकडाऊन जाहीर करण्याआधी प्रशासनाने व्यापाऱ्यांशी चर्चा करणे गरजेचे होते. परंतु, तसे न करता हा निर्णय घेण्यात आला. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोपही ओसवाल यांनी केला आहे.